टाकळी हाजीत शाळकरी मुलींची छेडछाड; आरोपी तरुण मोकाट | पुढारी

टाकळी हाजीत शाळकरी मुलींची छेडछाड; आरोपी तरुण मोकाट

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा : शाळेत पायी जाणार्‍या मुलींच्या अवतीभोवती दुचाकीवरून फिरणे, काहीतरी कारण काढून त्यांना थांबवणे, तसेच त्यांना वाईट नजरेने पाहणे असे धक्कादायक प्रकार एका तरुणाकडून टाकळी हाजी येथे घडू लागले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी शोध घेतला असता तो तरुण मंगळवारी (दि. 14) सकाळी येथील विद्यालयासमोर आढळून आला. चौकशीत या तरुणावर आळेफाटा पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. समज देत या तरुणाला सोडण्यात आले; मात्र तरीही मुलींसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून टाकळी हाजी परिसरात एका 25 वर्षीय तरुणाकडून शाळकरी मुलींचा पाठलाग करण्याचे प्रकार सुरू होते. याबाबत मुलींनी घरी पालकांना कल्पना दिली होती. काही मुलींच्या पालकांनी हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते व पोलिसांना सांगितला. त्यानुसार त्या तरुणाचा शोध घेतला. तो तरुण मंगळवारी (दि. 14) सकाळी विद्यालयासमोर आढळून आला. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, तो पारनेर तालुक्यातील रांधे येथील रहिवासी असून विवाहित असल्याचे तसेच त्याच्यावर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची कबुलीही त्याने दिली.

दरम्यान त्याला सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी यापुढे असे प्रकार घडू नये, अशी तंबी देत सोडून दिले; परंतु त्या तरुणाने बुधवारी (दि. 15) सकाळी पुन्हा टाकळी हाजी येथे येत एका दुकानदाराजवळ थांबून पोलिसांबद्दल अर्वाच्च भाषा वापरली. तसेच मरांजणगाव येथील एका प्रतिष्ठित ग्रुपच्या अध्यक्षाने त्यांच्याकडे पाहिले आहे, आता त्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे पाहायचे आहे,फ असा धमकीवजा इशारा दिला. या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button