पुणे : राज ठाकरे आभासी प्रचार तरी करा : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

पुणे : राज ठाकरे आभासी प्रचार तरी करा : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना भाजप उमेदवाराचा प्रचार करण्याची विनंती करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांनी जाहीर सभा न घेतल्यास, किमान आभासी माध्यमातून प्रचारात सहभागी व्हा, असे ठाकरे यांना सांगणार असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी बावनकुळे यांनी सर्व मित्रपक्षाच्या स्थानिक नेत्यांसमवेत बैठक घेतली. प्रचाराचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मनसेचा पाठिंबा घेतला आहे, महापालिकेत त्यांच्याशी युती करणार आहात का, या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस, मी, आम्ही सर्वच जण ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांचा निवडणूूक प्रचारात प्रेझेन्स कसा राहील, त्याबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे. सध्या या पोटनिवडणुकीबाबत चर्चा होत असून, महापालिका निवडणुकीसंदर्भात काहीही चर्चा करीत नाही.’

देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता, बावनकुळे म्हणाले, ‘फडणवीस कधीच असत्य बोलत नाहीत. 2019 मध्ये निवडणुका जिंकूनही सत्ता गमावली. देवेंद्र खुर्ची वाचवायला किंवा मिळवायला काही बोलत नाहीत. त्यांचे अनेकदा नुकसान झाले.

खोटे बोलणे हा त्यांचा स्वभाव नाही. मतमोजणीनंतर उद्धव ठाकरे यांनी दरवाजे बंद केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा अभिमन्यू झाला.’ बावनकुळे म्हणाले, ’सध्या डबल इंजिन सरकार आहे. त्यामुळे चिंचवड आणि कसबा पेठ या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडून येतील.’

Back to top button