पळसदेव : उजनीतील पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक | पुढारी

पळसदेव : उजनीतील पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक

प्रवीण नगरे

पळसदेव : पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याची तहान भागविणारे उजनी धरण यंदा 111 टक्के (123 टीएमसी) भरले होते. परंतु, सोलापूर जिल्ह्याला नदी, कॅनॉल, बोगद्याद्वारे पाणी वेगाने सोडल्याने जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने घटला आहे. धरणात मुबलक पाणीसाठा दिसत असला तरी योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.

उजनीतून पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागल्याने उजनी फुगवटा तसेच लाभक्षेत्र परिसरातील शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीसाठा एवढ्या झपाट्याने खाली जात असल्याने शेतकर्‍यांना सखल भागात पाईप, केबल वाढवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. उजनीतून शेतीसाठी व पिण्यासाठी जानेवारीला पहिले आवर्तन सोडले होते. त्या वेळी उजनीत 100 टक्के पाणीसाठा (117 टीमसी) होता. मात्र 23 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या 21 दिवसांत उजनीतले 37 टक्के पाणी कमी झाले आहे. गतवर्षी याच सुमारास उजनी जलाशयाची पाणी पातळी 100 टक्क्यांच्या पुढे होती हे विशेष !

सुरुवातीला पहिल्याच पाळीत इतके पाणी कमी झाल्याने उजनी धरणकाठ रिकामा होऊ लागला आहे. अजून पुढे संपूर्ण कडाक्याचा उन्हाळा येणार असल्याने पिण्याचे आणि शेतीच्या पाण्यासाठी मागणी वाढणार आहे. यामुळे पाण्याचा वापर आतापासूनच काटकसरीने करणे गरजेचे आहे. रब्बी हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात पाण्याची खूप गरज भासते. गतवर्षी प्रायोगिक तत्त्वावर उन्हाळ्यात दोन आवर्तने, तर रब्बी हंगामात एक आवर्तन सोडले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता तसा प्रस्ताव कालवा सल्लगार समितीपुढे ठेवल्याचे समजते.

14 फेब्रुवारी- 2023 रोजी उजनी धरणाची स्थिती
पाणीपातळी : 495.685 मीटर
एकूण पाणीसाठा : 2953.95 दशलक्ष घनमीटर (104.31 टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा : 1151.14 दशलक्ष घनमीटर (40.65 टीएमसी
टक्केवारी : 75.37 टक्के (घटलेले पाणी (11.74 टीएमसी )
23 जानेवारी- 2023 रोजी स्थिती
पाणीपातळी : 496.730 मीटर-
एकूण पाणीसाठा : 3286.54 दशलक्ष घनमीटर (116.05 टीएमसी),
उपयुक्त पाणीसाठा :1483.73 दशलक्ष घनमीटर (52.39 टीएमसी)
टक्केवारी : 97.79 टक्के

धरणातून सध्याचा विसर्ग
सीना – माढा बोगदा – 296 क्युसेक
दहेगाव उपसा सिंचन – 100 क्युसेक
मेन कॅनॉल – 800 क्युसेक

Back to top button