पुणे : कचरा पेटवल्याने महावितरणच्या वीजवाहिन्या जळाल्या | पुढारी

पुणे : कचरा पेटवल्याने महावितरणच्या वीजवाहिन्या जळाल्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटजवळ असलेल्या एका ओढ्याच्या पुलावरील कचरा अज्ञाताने पेटवल्यामुळे महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या तीन वीजवाहिन्या जळाल्या. यामध्ये दोन उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नांदेड गाव, खडकवासला, किरकटवाडी, वडगाव खुर्द, धायरीचा काही भाग या परिसरामध्ये मंगळवारी (दि. 14) सकाळी दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत माहिती अशी की, नांदेड सिटी गेटजवळील ओढ्यावरील पुलाच्या कठड्यावर कचरा टाकण्यात येत आहे.

हा कचरा अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आला. मात्र, कठड्यावरून जाणार्‍या महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या तीन वीजवाहिन्यांनी पेट घेतला. त्यामुळे खडकवासला व धायरेश्वर या दोन उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी नांदेड गाव, खडकवासला, किरकटवाडी, वडगाव खुर्द, धायरीचा काही भागातील सुमारे 18 हजार 500 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

अग्निशामक दलाने ही आग विझवल्यानंतर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कल्याण गिरी, सहायक अभियंता सचिन आंबवले व सहकार्‍यांनी तातडीने पर्यायी वीजपुरवठ्याची उपाययोजना केली. यानंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. केबल जळाल्याने महावितरणचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. कचरा पेटविणार्‍याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Back to top button