पुणे : टणू गावातील बॉम्बसदृश्य वस्तू स्फोट घडवून करण्यात आली निकामी | पुढारी

पुणे : टणू गावातील बॉम्बसदृश्य वस्तू स्फोट घडवून करण्यात आली निकामी

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : निरा आणि भिमा नदीच्या खोऱ्यातील इंदापूर तालुक्यातील टणू गावात बॉम्बसदृश्य सापडलेल्या वस्तूने दोन दिवस खळबळ माजली होती. अखेर पोलिसांसह बॉंबशोध पथकाने  स्फोट घडवत ही वस्तू निकामी केली. सोमवारी (दि. १३) दत्तात्रय  तुळशीराम मोहिते यांच्या गोठ्यात बॉम्ब सदृश वस्तू सापडली होती. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशीर झाल्यामुळे अंधारात याचा तपास व पुढील कारवाई करणे अवघड जात असल्याने तपास थांबविण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. १५) संपूर्ण तपास करून पुणे शहर आणि ग्रामीणच्या बीडीडीएसच्या पथकाच्या मदतीने ती संशयास्पद वस्तू दुपारी निकामी केली आहे.

जरी ही वस्तू निकामी करण्यात आली असली तरी अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहतात. संबंधित वस्तू या ठिकाणी कशी आली? हा नेमका बॉम्ब होता की आणखी काही? यात दारू होती का? यात कोणते पदार्थ होते याचा तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

इंदापूर तालुक्यात १२७ टीएमसी क्षमतेचे उजनी धरण आहे तसेच अगदी पाच किलोमीटर अंतरावर नीरा आणि भीमा नदीच्या तीरावर नीरा- नरसिंहपूर येथे श्री लक्ष्मी नरसिंहाचे पुराण काळातील मंदिर देखील आहे. अशा ठिकाणी अशी बॉंब सदृश्य वस्तू  सापडणे ही चिंतेची बाब आहे. पोलीस या सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होत हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी श्वान पथकाने देखील या वस्तूला बॉम्ब असल्याचा संकेत दिल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.

सोमवारी ही वस्तू मोहिते कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या वस्तूची खात्री करण्याकरता त्यांनी याचे काही फोटो काढून त्यांनी आपल्या सैन्यदलातील नातेवाईकांना पाठवले. त्यावर सदरील वस्तू ही बॉम्बसदृश्य असल्याची चर्चा सुरू झाल्याने  परिसरात एकच खळबळ उडाली. यावर घाबरलेल्या मोहिते यांनी आपल्या घराच्या पाठीमागील जवळच्या उसाच्या शेतामध्ये छोटासा खड्डा घेत त्या ठिकाणी ही वस्तू मातीआड करून टाकली आणि याबाबत पोलिसांच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली. त्यावर इंदापूर पोलिसांची यंत्रणा तात्काळ या ठिकाणी दाखल झाली. सोमवारी रात्री पुणे ग्रामीण पोलिसांचे बॉम्ब शोध व नाश पथक (बी.डी.डी.एस.) पथक देखील या ठिकाणी दाखल झाले. त्या वस्तूच्या जवळ कोणीही नागरिकांनी जाऊ नये म्हणून इंदापूर पोलिसांनी रात्रभर गस्त घालत खडा पहारा दिला.

मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून पुन्हा याचा तपास सुरू झाला. दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान पुण्यावरून आणखी एक बॉम्ब शोध व नाश पथक (बी.डी.डी.एस.) पथक या ठिकाणी दाखल झाले. ही घटना निदर्शनास आल्यापासून इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी सोमनाथ लांडे, आरिफ चाँदसाहेब सय्यद, विकास राखुंडे, सुरेंद्र वाघ, विरभद्र मोहळे, सचिन बोराडे, राकेश फाळके, समाधान केसकर, विनोद काळे, शुभांगी खंडागळे आदींजण घटनास्थळी तळ ठोकून होते.

जरी ही बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी केली असली तरी  या ठिकाणी ती आली कशी ? या पाठीमागील उद्देश काय ? आणि तो कोणी आणला ? यासारखे अनेक प्रश्न आता पोलीस यंत्रणेसमोर उभे राहिले. त्याची उत्तरेही पोलीस यंत्रणेला मिळवावी लागणार आहे.

 तपासणीसाठी अवशेष प्रयोग शाळेत पाठविणार

दत्तात्रय मोहिते यांच्या शेतात बॉम्बसदृश्य वस्तू असल्याचा फोन पोलीस यंत्रणे आला होता. त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी येऊन वस्तू संशयास्पद असल्याने पुणे ग्रामीणच्या पथकाला बोलविले. पथकाने त्याची पाहणी केल्यानंतर ते स्फोटक असल्याचे निष्पन्न झाले. त्यास सुरक्षित स्थळी नेऊन त्याचा स्फोट घडवत ते नष्ट केले. स्फोटानंतर त्याचे जे अवशेष आहेत ते ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

Back to top button