आंबेगावच्या पूर्वभागात चाराटंचाई; शेतकर्‍यांना विकत घ्यावा लागतोय चारा | पुढारी

आंबेगावच्या पूर्वभागात चाराटंचाई; शेतकर्‍यांना विकत घ्यावा लागतोय चारा

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात चाराटंचाई निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांना जनावरांसाठी जादा पैसे देऊन चारा विकत घेण्याची वेळ आताच आली आहे. दुधाचे बाजारभाव वाढत चालले असतानाच चाराटंचाईचे संकट निर्माण झाल्याने दुधाच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

तालुक्याच्या पूर्वभागात गेली एक-दीड महिन्यापासूनच चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अतिपावसाने डोंगर माळरानावरील सर्व चारा नष्ट झाल्याने यंदा लवकरच चाराटंचाई निर्माण झाली आहे. सध्या जनावरांना खायला चारा मिळत नसल्याने शेतकर्‍यांना विकत चारा घेऊन जनावरांना खाऊ घालावा लागत आहे. मका, उसाचे वाढे यांचे दरदेखील वाढले आहेत.

उसाच्या वाढ्याला शेकड्याला 300 रुपये शेतकर्‍यांना मोजावे लागत आहेत. दूध उत्पादक शेतकर्‍यांची चिंता मात्र वाढली आहे. दुधाचे दर आता वाढू लागले आहेत. परंतु आता जनावरांना हिरवा चारा खायला मिळत नाही. मका, उसाचे वाढे शेतकरी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून ठेवत आहेत. उन्हाळ्याचे पुढील 2 महिने अतिशय कठीण जाणार असल्याचे दूध उत्पादक शेतकर्‍यांनी सांगितले.

Back to top button