भीमेचं नदीपात्र झालंय हिरवंगार; जलपर्णीमुळे गुदमरतोय भीमेचा श्वास | पुढारी

भीमेचं नदीपात्र झालंय हिरवंगार; जलपर्णीमुळे गुदमरतोय भीमेचा श्वास

नानगाव; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा नदीपात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर जलपर्णी गोळा होऊ लागली आहे. त्यामुळे भीमेचे पात्र सर्वत्र हिरवेगार झाले आहे. मोठ्या प्रमाणावर साठलेल्या जलपर्णीमुळे भीमेचा श्वास गुदमरत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साठत असते. साठत असलेली जलपर्णी ही दोन प्रकारची आहे. एक जलपर्णी मोठी होऊन तिला निळसर, मोरपंखी फुले येतात; तर दुसरी जलपर्णी आकाराने छोटी असून, तिला फुले येत नाहीत.

जसजशी जलपर्णी नदीपात्रात वाढत जाते, तसतशी नदीकाठी पाण्याची दुर्गंधी वाढत जाते. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे पाण्यातील जलचरांना मृत्यूला सामोरे जावे लागते. एकीकडे पाण्याची दुर्गंधी, तर दुसरीकडे मृत पडलेल्या जलचरांची दुर्गंधी, यामुळे नदीकाठी बसणे देखील कठीण होत असते. काही दिवसांनंतर जलपर्णी सडण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा वेळी तर मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते, तर नदीकाठच्या गावांना डासांचा मोठा उपद्रव सहन करावा लागतो. या वेळी डासांपासून होणार्‍या आजारांमुळे गावागावांतील नागरिक हैराण होतात तसेच गावागावांत डास प्रतिबंधक फवारण्या केल्या जातात.

जलपर्णीमुळे नदीकाठच्या गावातील मच्छीमारी करणार्‍या व्यावसायिकांना या जलपर्णीचा मोठा फटका सहन करावा लागतो. जोपर्यंत मोठा पाऊस पडून नदीपात्रातील जलपर्णी निघून जात नाही तोपर्यंत मच्छीमारांचे आर्थिक गणित कोलमडून पडते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण करणार्‍या या जलपर्णीवर कायमचा तोडगा निघावा व भीमाईचा श्वास मोकळा व्हावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून पुढे येत आहे.

 

Back to top button