निरा : महावितरणसह पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा | पुढारी

निरा : महावितरणसह पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा

निरा (ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : महावितरण कंपनीने मांडकी येथील शेतीपंपांचे बंद केलेले विजेचे ट्रान्सफॉर्मर पूर्ववत सुरू करावे, यासाठी निरा (ता. पुरंदर) येथील महावितरण कार्यालयावर तसेच इरिगेशन पाणीपट्टीत वीसपटीने केलेली दरवाढ मागे घ्यावी, यासाठी निरा पाटबंधारे कार्यालयावर शेतकर्‍यांनी सोमवारी (दि. 13) मोर्चा काढला. या मोर्चात निरा, पिंपरे खुर्द, मांडकी, जेऊर, पिसुर्टी, गुळुंचे, कर्नलवाडी आदी भागांतील शेतकरी सहभागी झाले होते.

निरा ग्रामपंचायतीपासून मोर्चास सुरुवात झाली. जोरदार घोषणा देत महावितरणच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला. महावितरणने मांडकी येथील शेतकर्‍यांना कोणतीही सूचना न देता शुक्रवार (दि. 10) पासून शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे पिके जळू लागली. तसेच, निरा पाटबंधारे विभागाने भैरवनाथ पाणीपुरवठा मंडळी या संस्थेच्या लाभधारक शेतकर्‍यांच्या पाणीपट्टीत वीसपटीने दरवाढ केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

महावितरणच्या निरा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कल्पना दराडे यांना निवेदन दिले. या वेळी सहा. अभियंता मनोज पाटील, जेजुरी शहरचे सहा. अभियंता संदीप काकडे, अ‍ॅड. फत्तेसिंह पवार, माणिक महाराज पवार, अंकुश जगताप, प्रवीण जगताप, उमेश मांडके, सतीश जगताप, मोहन जगताप, कांचन निगडे, अनिल चव्हाण, राजेश काकडे, उत्तम धुमाळ, राजेंद्र बरकडे, संतोष निगडे आदी उपस्थित होते.

निरा उपविभागातील शेतकरी प्रतिनिधींबरोबर सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेत शेतकर्‍यांनी दोन बिले भरण्याचे ठरले. त्यानुसार महावितरण कंपनी शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे.

                        – कल्पना दराडे, उपअभियंता, महावितरण, निरा उपविभाग

मांडकी येथील लाभधारक शेतकर्‍यांंनी पाणीपट्टी दरवाढ मागे घेण्याबाबत निवेदन दिले आहे. ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार आहेत.

           – प्रशांत डेसले, शाखाधिकारी, निरा पाटबंधारे विभाग, पिंपरा शाखा

Back to top button