बारामती : तब्बल पाच दिवस शाळा राहणार बंद | पुढारी

बारामती : तब्बल पाच दिवस शाळा राहणार बंद

बारामती; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाने 15 ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे. राज्यातील शिक्षकांना यामुळे शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून एकत्रित पाच दिवसांची सुटी मिळणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. परंतु यामुळे तब्बल पाच दिवस शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे वार्षिक अधिवेशन व शिक्षण परिषद रत्नागिरी येथील चंपक मैदानावर 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, विरोधी पक्षनेते अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्यातील सर्वांत मोठी शिक्षक संघटना आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेचे राज्यभरात दोन लाखांहून अधिक सभासद आहेत. शिक्षक संघाच्या राज्य अधिवेशनावेळी बहुसंख्य शिक्षक उपस्थित राहणार असल्याने राज्यातील शाळा या वेळी बंद राहणार आहेत. राज्य शासनाने या अधिवेशनास उपस्थित राहणार्‍या शिक्षकांसाठी 15 ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा मंजूर केली आहे. 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री व 19 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने सलग पाच दिवसांची सुटी राज्यातील शिक्षकांना मिळणार आहे.

जुनी पेन्शन योजना, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, समाजशास्त्र शिक्षकांना संरक्षण, जुन्या अवघड क्षेत्रातील शिक्षकांना बदलीमध्ये वाढीव संधी, विनाअट घरभाडेभत्ता, महापालिका वाढीव हद्दीतील शाळांचे शिक्षकांसह वर्गीकरण, एमएससीआयटी मुदतवाढ, शिक्षण सेवक भरती, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती यांसह अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातून रत्नागिरी येथील अधिवेशनासाठी 10 हजार हून अधिक सभासदांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातून या अधिवेशनाला 10 हजार शिक्षक-शिक्षिका उपस्थित राहतील.

                          बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ, पुणे

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष
शिक्षक संघाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत, शिक्षकांच्या विशेष रजेसाठी शालेय शिक्षण, ग्रामविकास व नगरविकास विभागास खुद्द मुख्यमंत्री कार्यालयातून निर्देश दिले गेले आहेत यामुळे प्रत्यक्ष अधिवेशनात शिक्षकांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्या घोषणा करतात याकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे

Back to top button