पुणे : शिवजयंती उत्सवाला अमित शहा शिवनेरीवर?

पुणे : शिवजयंती उत्सवाला अमित शहा शिवनेरीवर?

पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय एकाही पक्षाचे पान हलत नाही. यामुळेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून यंदा शिवजयंती महोत्सवाला अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 19 फेब्रुवारीला पुणे दौर्‍यावर असून, ते शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर येऊ शकतात. त्यासंदर्भात प्रशासनाची प्राथमिक तयारी सुरू आहे.

राज्यात दर वर्षी 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव शिवजयंती म्हणून सर्वत्र धूमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा शिंदे-फडणवीस सरकारकडून 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत किल्ले शिवनेरी (जुन्नर) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 393 वा जन्मोत्सव 'हिंदवी स्वराज महोत्सव' म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्त किल्ले शिवनेरीसह जुन्नर शहर आणि संपूर्ण राज्यातच विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

दर वर्षी शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु, यंदा आगामी निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर शिवजयंती महोत्सवाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळेच भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच किल्ले शिवनेरीवर बोलावून नवा इतिहास निर्माण करण्याचा राज्यातील भाजप नेत्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. 19 फेब्रुवारी रोजी अमित शहा पुणे दौर्‍यावर येत असून, ते किल्ले शिवनेरीवर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. अमित शहा किल्ले शिवनेरीवर येणारे पहिले केंद्रीय गृहमंत्री असू शकतात.

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर शिवजन्मभूमीत येत आहेत. देशाचे पहिले गृहमंत्री असतील किल्ले शिवनेरीवर येणारे. त्यामुळे माझ्यासह जुन्नरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही सर्व नक्कीच स्वागत करू. केंद्रीय गृहमंत्र्यांनी किल्ले शिवनेरी व शिवजन्मभूमीच्या विकासासाठी भरीव निधी द्यावा तसेच राज्य शासनाने शिवजन्मभूमीतील विकासकामांना दिलेली स्थगिती देखील उठवावी, ही देखील विनंती आहे.
                                                        -अतुल बेनके, आमदार जुन्नर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news