

प्रसाद जगताप :
पुणे : गेल्या तीन वर्षांत पुणे शहरात 718 वाहनचालकांचा, तर पिंपरी-चिंचवड शहरात 916 जणांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे मिळून तब्बल 1 हजार 634 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहन अपघातांमध्ये मोठी वाढ होत आहे. मात्र, अपघात रोखण्यासाठी शहरांतील प्रशासकीय यंत्रणांकडून अद्याप ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत पुणे शहर आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 2 हजार 94 अपघात झाले. यात 718 वाहनचालकांचा अपघाती मृत्यू झाला, तर 1 हजार 266 गंभीर जखमी झाले. तसेच, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या तीन वर्षांत 2 हजार 274 अपघात झाले. यात 916 जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर 1 हजार 353 जण गंभीर जखमी झाले आहेत.
कडक कारवाई करणे गरजेचे
अपघात रोखण्यासाठी शहरामध्ये बेशिस्तपणे वाहन चालविणार्या आणि वाहतूक नियमांचे पालन न करणार्या वाहनचालकांवर कडक कारवाई करावी. आरटीओ, पुणे शहर वाहतूक पोलिस, यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग (रस्ते दुरुस्ती), महानगरपालिका यांनी आता याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
वाहतूक पोलिसांनी कोंडीचे नियोजन करावे
वाढत्या वाहनसंख्येमुळे दररोज ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीतून सुटण्यासाठी वाहनचालक अनेकदा वाहने वेगाने पळवतात. त्यांच्या या प्रयत्नातसुध्दा चौकांमधील सिग्नलवरच अनेकदा मोठे अपघात घडले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी प्रत्येक मोठ्या चौकांमध्ये उभे राहून वाहतुकीचे नियोजन करायला हवे, अशी पुणेकरांची अपेक्षा आहे.
पुणे शहरातील अपघातांची संख्या
अ. साल/ अपघाती गंभीर एकूण
क्र. वर्ष मृत्यू जखमी अपघात
1) सन 2020 143 297 482
2) सन 2021 255 457 741
3) सन 2022 320 512 871
एकूण अपघाती मृत्यू : 718
एकूण गंभीर जखमी : 1266
एकूण अपघात : 2094