पुणे : कोयता टोळीतील तिघांना अटक | पुढारी

पुणे : कोयता टोळीतील तिघांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हडपसर परिसरात कोयता घेऊन दहशत माजविणार्‍या व दरोडा, खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यात फरारी असलेल्या दोघांना हडपसर पोलिस ठाण्याच्या पथकाने शिरूर येथील पाबळमधील रानात पाठलाग करून पकडले. कोयता टोळीतील मुख्य आरोपी बिट्या संजय कुचेकर (22, रा. मांजरी, हडपसर) आणि पंकज गोरख वाघमारे (28, रा. बंटर स्कूलजवळ, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. 3 जानेवारी रोजी घडलेल्या दरोडा व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कोयता टोळीतील बिट्या कुचेकर आणि पंकज वाघमारे हे फरारी झाले होते.

त्यानुसार हडपसर पथकातील अंमलदार निखील पवार, समीर पांडुळे, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ पाबळ येथे गेले. ते पोलिसांची चाहूल लागताच त्यांना पाहून शेतातून पळून जात असताना पथकाने त्यांना पाठलाग करून पकडले. यापूर्वी गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने याच टोळीतील राहुसिंग भोंड व अन्य दोन आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले सर्व सराईत गुन्हेगार आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. फरार झालेल्या कोयता टोळीशी संबंधित असलेल्या आरोपीला हडपसर पोलिस ठाण्याच्या पथकातील दोन कर्मचारी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पकडले. सत्यम भोसले याला अहमदनगर येथील पाथर्डी येथून बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिस अंमलदार चंद्रकांत रेजितवाड आणि अजित मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button