पुणे : वर्षभरात 15 हजार नागरिकांना अतिसाराचा त्रास | पुढारी

पुणे : वर्षभरात 15 हजार नागरिकांना अतिसाराचा त्रास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अस्वच्छ अन्नपदार्थांच्या सेवनामुळे आणि दूषित पाण्यामुळे अतिसाराचा त्रास उद्भवतो. उलट्या आणि जुलाब होणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे यामुळे अशक्तपणा येतो. गेल्या वर्षभरात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 15 हजार नागरिकांवर अतिसारविरोधी उपचार करण्यात आले आहेत. पावसाळ्यात दूषित पाणी आणि अन्नपदार्थांचे प्रमाण वाढते. मात्र, सध्या पुण्यातील तापमान अचानक वाढले आहे. तीव— उष्णतेमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात, पाण्याची गुणवत्ताही खराब होते. त्यामुळे फेब—ुवारी ते ऑगस्ट या काळात अतिसाराचा त्रासही बळावतो. त्यामुळे वर्षभर सकस अन्नपदार्थ खावेत आणि भरपूर पाणी पिण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

काय काळजी घ्यावी?
स्वयंपाकाची जागा कायम स्वच्छ ठेवावी.
स्वच्छ पाणी आणि उकळून थंड केलेले पाणी प्यावे.
शिळे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
जेवणाआधी आणि जेवणानंतर, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवावेत.
जास्त त्रास होत
असल्यास त्वरित
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत असताना अतिसार, उलट्या आणि जुलाब होणे, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे उद्भवतात. अशा परिस्थितीत संत्री, द्राक्षे, बीट, हिरव्या भाज्या, अंडी आणि मांस आदींचे सेवन करावे. व्हिटॅमिन सी, बी 12, झिंक आणि डी यामुळे प्रतिकारशक्ती वाढू शकते. मसालेदार, जंक फूड आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन टाळा.
                                                  – डॉ. मुकेश मेहता, जनरल फिजिशियन

पाणी उकळून व गाळून पिणे फायद्याचे ठरते. पालेभाज्या, फळे वापरण्यापूर्वी स्वच्छ धुऊन घ्या. मुलांना ओआरएस, झिंक आणि प्रोबायोटिक्स द्यावे. विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उकळून थंड केलेले पाणी व योग्य पध्दतीने शिजवलेल्या अन्नाचा वापर करावा.
                                                        – डॉ. अंजली प्रभुणे, बालरोगतज्ज्ञ

Back to top button