पुणे : क्रीडा उपसंचालकांची हिटलरशाही ; तब्बल 10 कामगारांच्या कुटुंबांना एका रात्रीत बेघर करण्यात आले | पुढारी

पुणे : क्रीडा उपसंचालकांची हिटलरशाही ; तब्बल 10 कामगारांच्या कुटुंबांना एका रात्रीत बेघर करण्यात आले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कामगार कायम करण्याबाबत न्यायालयामध्ये याचिका दाखल असतानाही म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलातील तब्बल 10 कामगारांच्या कुटुंबांना एका रात्रीत बेघर करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून हे सर्व कुटुंबीय रस्त्यावर आले असून, क्रीडा उपसंचालकांच्या या हिटलरशाहीचा निषेध केला जात आहे. बालेवाडी येथील स्टेडियममध्ये 2001 पासून कामगार काम करीत असून, 2003 च्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 240 दिवस पूर्ण झाले असतील, तर त्यांना कायम करावे, असा निर्णय देण्यात आला होता.

परंतु, शासनाच्या क्रीडा विभागाकडून या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. तब्बल 114 कर्मचार्‍यांचा हा विषय गेल्या काही दिवसांपासून प्रलंबितच आहे. स्टेडियममधील तब्बल 10 कामगारांना त्यांच्या कुटुंबासह बेघर करण्यात आले आहे. त्यांच्या सर्व वस्तू, घरातील सामान बाहेर काढण्यात आले असून, हे सर्व कामगार आणि त्यांचे कुुटुंबीय सध्या रस्त्यावरच राहत आहेत. दरम्यान, ही कारवाई न्यायालयाच्या निर्णयानुसारच झाली असल्याचा दावा संबंधित क्रीडा उपसंचालकांनी दै. ’पुढारी’शी बोलताना केला.

 

कोणत्याही प्रकारची लेखी सूचना न देता कामगारांना घराबाहेर काढणे हे चुकीचे आहे. अशा पध्दतीची कारवाई ही फौजदारी गुन्ह्याप्रमाणे आहे. कामगारांवरील या कारवाईबाबत आम्ही न्यायालयातून दाद मागणार असून, संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करावी आणि कामगारांना पुन्हा घर द्यावे, ही आमची प्रमुख मागणी असणार आहे.
                                                -सुनील शिंदे, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर संघ

आम्हा कामगारांना कायम करण्याबाबतची याचिका न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. असे असतानाही स्टेडियमच्या अधिकार्‍यांकडून आम्हाला बेघर करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची लेखी नोटीस आम्हाला दिलेली नसतानाही अशी कारवाई करण्यात आली असून, आम्हाला न्याय मिळणे अपेक्षित आहे.
                                                 – आप्पा बकाले, स्टेडियममधील कामगार

स्टेडियममधील संबंधित कामगार हे आमच्याकडे रोजंदारीवर नाहीत. त्यांच्यावरील कारवाई ही न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच झाली आहे. यासंदर्भातील अधिक माहिती क्रीडा आयुक्तांकडूनच मिळू शकेल.
                    – सुहास पाटील, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

 

Back to top button