पिंपरी : स्नेहसंमेलनामुळे महापालिकेच्या तिजोरीत भर ; निळू फुले नाट्यगृह मार्चअखेर हाऊसफुल्ल | पुढारी

पिंपरी : स्नेहसंमेलनामुळे महापालिकेच्या तिजोरीत भर ; निळू फुले नाट्यगृह मार्चअखेर हाऊसफुल्ल

संतोष महामुनी: 

नवी सांगवी : शहरातील कलाकारांच्या गुणांना वाव मिळावा व रसिकांना अभिनयाचा आनंद लुटता यावा, यासाठी महापालिका प्रशासनाने पिंपळे गुरव येथे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारले आहे. येथील निळू फुले नाट्यगृह चक्क मार्चअखेरपर्यंत हाऊसफुल्ल झाले आहे. शाळांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यासाठी मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळा येथील नाट्यगृहात धाव घेत आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार मार्चअखेरपर्यंतच्या तारखा बुकिंग झाल्या आहेत. इतर दिवशी म्हणजेच सोमवार ते गुरुवार देखील मोठ्या प्रमाणात शाळांनी बुकिंग केलेले आहे. मोजकेच सणवारांचे दिवस सोडले तर नाट्यगृह बुक झाल्याचे येथील व्यवस्थापक पुरुषोत्तम ढोरे यांनी माहिती देताना सांगितले.

डिसेंबर महिन्यांपासून शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा धडाका येथील नाट्यगृहात सुरू आहे. अनेक शाळा सरावासाठी देखील बुकिंग करीत आहे. येथे नाटकांचे प्रयोग कमी मात्र, बाराही महिने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते. पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेचे एकूण चार नाट्यगृहे आहेत. इतर नाट्यगृहापेक्षा येथील नाट्यगृहाचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे दर देखील अव्वाच्या सव्वा असूनही सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीतही मोठी भर पडत आहे.
1 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान तब्बल पाच लाख तीस हजार रुपये (अंदाजे उत्पन्न) महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे.

नाट्यगृहात सुसज्ज रंगमंच, पार्किंग सोय, विद्युत व्यवस्था, वातानुकूलित हॉल व इतर सर्व सुख सोयी सुविधांनी सुसज्ज, असे प्रेक्षागृह रसिकांना सतत भुरळ घालत आहे. येथील नाट्यगृह पिंपळे गुरव पुरते मर्यादित न राहता औंध, चतुशृंगी, वाकड, सांगवी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख आदी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा, महाविद्यालये या नाट्यगृहाला पसंती देत आहेत.  वर्षभरात नाटक, मराठी सिनेमांचे पोस्टर लॉन्चिंग, सहकारी बँका, पतसंस्था यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभाही येथे होतात. तळमजल्यावर नाट्यगृह, पहिल्या मजल्यावर बाल्कनी, व्यवस्थापकीय कार्यालय तर दुसर्‍या मजल्यावर श्रीपती गांगार्डे बहुउद्देशीय हॉल उपलब्ध आहे. नाट्यगृहात 388 तर बाल्कनीमध्ये 168 खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. लिफ्टची सोय, महापालिकेचे 1 व्यवस्थापक, 1 क्लार्क, 5 कर्मचारी कार्यरत आहेत. 14 खाजगी कर्मचारी व 6 खाजगी सुरक्षा रक्षक आहेत. पार्किंग सोय उपलब्ध आहे. याठिकाणी आधुनिक सर्व सुखसोयी उपलब्ध आहे.

Back to top button