पुणे : शिरदाळे-धामणी घाटात बसविले संरक्षण कठडे ; शिरदाळे ग्रामपंचायत मागणीला यश | पुढारी

पुणे : शिरदाळे-धामणी घाटात बसविले संरक्षण कठडे ; शिरदाळे ग्रामपंचायत मागणीला यश

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा :  शिरदाळे (ता. आंबेगाव) ते धामणी रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. काम सुरू असताना घाटात रोडरोलर दोनशे फूट दरीत कोसळून मोठा अपघात झाला होता. त्यामुळे घाटात संरक्षण कठडे बसवण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. ही मागणी पूर्ण झाली असून, कठडे बसवण्यास प्रारंभ झाला आहे.

शिरदाळे ते धामणी रस्ता चांगल्या दर्जाचा झाल्याने रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. त्यामुळे शिरदाळे ग्रामपंचायतच्या वतीने घाटात संरक्षण कठडे बसवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार करण्यात येत होती. कठडे बसवण्यास विभागाने सुरुवात केल्याने घाटात होणारे अपघात व हानी कमी होणार असल्याचे सरपंच वंदना तांबे, उपसरपंच मयूर सरडे, मनोज तांबे, बिपीन चौधरी, जयश्री तांबे यांनी सांगितले. धामणीवरून खेडकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असून त्यावर आता वाहनांची वर्दळ वाढली आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांची आग्रही मागणी मान्य झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. शनिवारी काम चालू असताना गणेश तांबे व उपसरपंच मयूर सरडे यांनी पाहणी केली व घाट रस्त्यात बॅरिकेड्स बसवल्याने समाधान व्यक्त केले.

खरेतर या रस्त्यावर खूप वळणे असल्याने अपघाताची शक्यता जास्त असते. हे बॅरिकेड्स खूप आधी बसवायला हवे होते. पण, उशिरा का होईना सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. चालकांनीही आपल्या वाहनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
                                                             मयूर सरडे, उपसरपंच शिरदाळे.

Back to top button