पुणे : खा. बापट यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट ! | पुढारी

पुणे : खा. बापट यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आम्ही विधानसभेतील जुने मित्र आहोत. मित्राच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी आलो असता, जुन्या आठवणींना त्यांनीच उजाळा दिला. सदिच्छा भेटीदरम्यानही त्यांनी कसबा व चिंचवड जागेवर पुन्हा ताबा मिळविणारच असल्याचा दावा करीत आजही राजकारणात सक्रिय असल्याचे दाखवून दिल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. पुण्याचे खासदार गिरीश बापट अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे शनिवारी (दि. 11) त्यांच्या घरी गेले होते.

यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आमच्या भेटीदरम्यान सभागृहातील आठवणी अन् होत असलेल्या गप्पांना उजाळा दिला गेला. मुरब्बी राजकीय नेतृत्व अन् काहीही घडविण्याची क्षमता असलेले नेते म्हणून बापट यांची ओळख आहे. राजकीय इच्छाशक्ती कशी दृढ आहे तसेच जीवन जगण्याबाबत त्यांची नवी उमेद पाहता लवकरच ते राजकारणात सक्रिय होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.  राजकीय गप्पांचा फड रंगलेला असतानाच बापट यांनीच कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीबाबत विषय करून दोन्ही जागा आपल्याच ताब्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांच्यासोबत खा. श्रीरंग बारणे, महेश लांडगे, माजी मंत्री विजय शिवतारे, किरण साळी, गौरव बापट, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची उपस्थिती होती.

Back to top button