

कोथरूड : पुढारी वृत्तसेवा : नागरिकांना सुरक्षित चालता यावे तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पालिकेकडून रस्ते व पदपथ विकसित करण्यात येत असतात. परंतु मागील महिन्यापासून पदपथावर अतिक्रमणे वाढत असल्याचे चित्र कर्वेनगर भागात पाहावयास मिळत आहे. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असून, 'आम्ही कोठून चालावे?' असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. कायमस्वरूपी ही समस्या उद्भवत असल्याने व उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. कर्वेनगर भागात कॅनॉल रस्ता विकसित केलेला असून, मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला पर्याय व अंतर्गत वाहतुकीसाठी तो उपयुक्त ठरत असतो.
पालिकेचे विजया शिर्के आरोग्य केंद्र येथे कॅनॉल रस्त्यावर चौक असून, येथे वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या याठिकाणी चौकाकडून भारत कॉलनीकडे जाणार्या मार्गावर स्टॉल, हातगाड्या, टेबल मांडून व्यवसाय करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. यामुळे खाद्यप्रेमी, खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. स्टॉल, हातगाडी व रस्त्यावर पार्किंग होत असलेली वाहने यामुळे कॅनॉल रस्त्याची रुंदी कमी होते. प्रामुख्याने संध्याकाळी व्यवसाय सुरू होत असल्याने रस्त्यावर वाहने मोठ्या प्रमाणात पार्क केली जातात.
यामुळे संध्याकाळपासून रात्रीपर्यंत वाहतूक कोंडी अधिक होते. कामावरून घरी जाताना नित्याने वाहतूक कोंडीत अडकत असल्याची माहिती वाहनचालक व नागरिकांनी दिली. अनेकदा तासभर वाहतूक कोंडी असते तसेच अनेकदा वाहतूक पोलिस नसल्याने ही कोंडी लवकर सुटत नाही. यामुळे घरी जाण्यास उशीर होत असल्याची बाब महिलावर्गाने बोलून दाखविली.
कॅनॉल रस्ता पालिकेने पाटबंधारे विभागाकडून भाडेतत्त्वावर घेतला असून, त्यावर अतिक्रमण झाल्यास पालिकेनेच काढले पाहिजे अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका निवृत्त अधिकार्याने दिली.