राष्ट्रवादीच्या आमदारावरील सेक्सटॉर्शनचा ट्रॅप फसला, पुणे पोलिसांनी उधळून लावला कट | पुढारी

राष्ट्रवादीच्या आमदारावरील सेक्सटॉर्शनचा ट्रॅप फसला, पुणे पोलिसांनी उधळून लावला कट

पुणे, पुढारी वृत्तसेवा : एकीकडे शहरात सेक्सॉटर्शनच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार वाढत असताना आता यात लोकप्रतिनिधींना देखील ओढले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परंतु मोहोळचे आमदार यशवंत माने धाडसाने पुढे आल्याने जाळ्यात अडकण्या अगोदरच पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हेगाराचा कट उधळून लावत आरोपीला राजस्थान येथून बेड्या ठोकल्या आहेत. सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

रिझवान अस्लाम खान (24, रा. ग्रामसिहावली, महारायपूर, भरतपूर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये त्याने अशा प्रकारे तब्बल 81 जणांना फोनकरून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिनल तुपे-पाटील, सहाय्यक निरीक्षक बलभिम ननवरे, उपनिरीक्षक सचिन जाधव, राजकुमार जाबा, शिरीष गावडे, श्रीकृष्ण नागटिळक,संदिप यादव, प्रविणसिंग राजपुत, पुजा मांदळे यांच्या पथकाने केली आहे.

फिर्यादी यशवंत माने हे मोहोळ येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. ते पुण्यात राहण्यास आहेत. त्यांना 23 जानेवारी रोजी फेसबुकद्वारे मॅसेज आले होते. अनोळखी तरूणीचे मॅसेज आल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पण, त्यांना सतत 7 दिवस मॅसेजचा भडिमार करण्यात आला. नंतर 31 जानेवारी रोजी थेट फेसबुकवरच व्हिडीओ कॉल आला. त्यांनी याकडेही दुर्लक्ष केले. पण, काही तरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सतत फोन येत असल्याने त्यांनी शेवटी रात्री दहाच्या सुमारास तो व्हिडीओ कॉल उचलला. त्यावेळी काही सेंकदासाठी तो कॉल सुरू राहिला. त्यानंतर तो कट झाला. पण, त्यानंतर त्यांना धमकीचे फोन सुरू झाले. आम्ही तुमचे व्हिडीओ व्हायरल करू, असे म्हणत त्यांना स्क्रीन शॉट पाठविले. त्यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली.

पण, त्यांच्या धमक्यांना बळी न पडता आमदार माने यांनी पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना याची माहिती दिली. तसेच, कारवाई करण्याबाबत मागणी केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. तसेच, तांत्रिक तपास सुरू केला. त्यावेळी आरोपी भरतपुर येथील असल्याचे समजले. पोलिस पथकाने भरतपुर येथे जाऊन तब्बल सात दिवस या ठिकाणी राहून राजस्थान पोलिसांची मदत घेऊन आरोपीचा माग काढला. त्यानंतर त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने त्याला 15 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सेक्सस्टॉर्शनचा प्रकार ऐकून होतो. पण, मी या धमक्यांना बळी न पडण्याचे ठरवले. तसेच, त्यांनाच तुम्हाला काय करायचे ते करा म्हणत पोलिसांकडे तक्रार दिली. सेक्सॉटर्शनचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. खूपच भयानक व मानावर घात करणारे आहे. पुणे पोलिसांचे मी आभार मानतो. प्रतिसाद न देताच आपल्याला यात अडकविले जाते. पण, असे कोणासोबतही घडू नये. अनावधानाने घडल्यास न घाबरता तक्रार करावी. हा प्रश्न विधान सभेतही उपस्थित करणार आहे.
– यशवंत माने, आमदार

सायबर गुन्हेगारांकडून सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे सातत्याने येत आहेत. नागरिकांनीही या जाळ्यात अडकण्यापासून सावध राहिले पाहिजे. अशा पध्दतीचे अश्लिल मेसेज कोणी करत असेल तर त्याला प्रतिसाद न देता वेळीच असे नंबर ब्लॉक केले पाहिजे. अशा गुन्ह्यात तुम्हाला कोणी अडकविण्याचा प्रयत्न करत असेल किंवा अडकवले असेल तर पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली पाहिजे.
– रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त गुन्हे.

तेरा महिन्यात पंधराशे तक्रारी

पुणे शहरात मागील वर्षात सेक्सटॉर्शन झाल्याबाबतच्या तब्बल 1400 तक्रारी पुणे सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. तर चालू वर्षात 100 हून अधिक तक्रारी पुणे पोलिसांना प्राप्त झाल्या असून त्या पैकी सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Back to top button