राहुल कलाटे यांची माघार नाहीच, चिंचवडची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम, आता तिरंगी लढत होणार | पुढारी

राहुल कलाटे यांची माघार नाहीच, चिंचवडची पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम, आता तिरंगी लढत होणार

पुढारी ऑनलाईन: चिंचवड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी प्रयत्न केले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनीही फोनवरुन त्यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये माझा विजयनक्की आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. राहुल कलाटेंमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं समोर आलं. यानंतर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल कलाटे यांची भेट घेत त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली. यामध्ये राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार, आमदार सुनील शेळके, शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर आणि त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना फोन करुन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली होती. तरीही राहुल कलाटे आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने महाविकास आघाडीचे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.

शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे व बंडखोर कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. संभाजी बिग्रेड पार्टीसह 5 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यात राजेंद्र काटे, भाऊ अडागळे, प्रवीण कदम, ऍड मनीषा कारंडे व रवींद्र पारधे यांच्या समावेश आहे. आता 33 पैकी 28 उमेदवार रिंगणात आहेत. अपक्ष 26उमेदवारांना  चिन्ह वाटप करण्यात आले आहे.

Back to top button