पुणे: बीआरटी सक्षमीकरणावर भर देणार: ओमप्रकाश बकोरिया | पुढारी

पुणे: बीआरटी सक्षमीकरणावर भर देणार: ओमप्रकाश बकोरिया

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी बस रॅपिड ट्रान्झिट म्हणजेच बीआरटी आवश्यक आहे, आणि तीच बीआरटी सक्षम कारण्यावर आम्ही भर देणार आहोत, असे पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी शुक्रवारी सांगितले.

पुणे शहरासाठी बीआरटी कितपत महत्त्वाची आहे, ती वाचवायला हवी की नको, बीआरटीचा पुणेकरांना फायदा होणार का? यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि बीआरटीचे नेटवर्क सुधारून त्यावर विविध उपाय योजना होण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा शुक्रवारी घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली. यावेळी पीएमपीचे अधिकारी, परिसर संस्थेचे पदाधिकारी, पीएमपी प्रवासी मंचचे पदाधिकारी, वाहतूक तज्ञ, पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यात पीएमपी अध्यक्ष बकोरिया यांच्यासह पीएमपी प्रवासी मंचाचे जुगल राठी, वाहतूक तज्ञ प्रांजली देशपांडे, हर्षद अभ्यंकर, रणजीत गाडगीळ व अन्य उपस्थित होते.

तसेच, पुण्यातील बीआरटी कॉरिडॉर दररोज 4 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा देतो. बीआरटी नेटवर्क विस्तारल्यास त्यात वाढ होऊ शकते, असे मत उपस्थित सर्व तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले.

पुण्यात फक्त 45 किमी बीआरटी मार्ग कार्यरत…

पुण्यात नियोजित 145 किमी बीआरटीएस नेटवर्कपैकी फक्त 70 किमी पूर्ण झाले होते, त्यापैकी सध्या फक्त 45 किमी कार्यरत आहेत.  सध्या सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामामुळे अनेक कॉरिडॉरवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हे वाढवणे गरजेचे आहे.

बीआरटी कॉरिडोरमुळे बसचा वेग 25 किमी प्रति तास…

पीएमपीने कार्यशाळेदरम्यान सध्याच्या बीआरटीएस प्रणालीचा डेटा सादर केला. यात पीएमपी प्रशासनाने बी आर टी कॉरिडॉरमुळे बसचा वेग 25 किलोमीटर प्रति तास इतका वाढला आहे, असे सांगत बीआरटी मार्गाच्या बाहेर धावणाऱ्या बसचा वाढत्या गर्दीमुळे प्रति तास वेळ कमी झाला असल्याचे सांगितले.

Back to top button