

दौंड : पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्टेशनमार्गे दोन 'वंदे भारत एक्स्प्रेस' धावणार आहेत. पैकी सोलापूर ते मुंबई 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे लोकार्पण 10 फेब्रुवारी ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईला होणार आहे. सोलापूरहून सुटल्यानंतर या एक्स्प्रेसला दौंड रेल्वे स्टेशनवर पहिल्या फेरीपुरता दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. दौंड रेल्वे स्थानक प्रशासनाकडून या एक्स्प्रेसच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. सोलापूर ते मुंबई 'वंदे भारत एक्स्प्रेस' ही सोलापूरहून 10 फेब्रुवारी ला सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी सुटेल. ती पुण्यात 9 वाजता दाखल होईल. त्यानंतर ती मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी ती मुंबईहून सुटेल.
या वेळी पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवतील. सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुण्याला दाखल होईल. त्यानंतर सोलापूरला रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. ही सेवा आठवड्यातून सहा दिवस असेल. मुंबईहून बुधवारी आणि सोलापूरहून गुरुवारी ही एक्स्प्रेस धावणार नाही. दौंड रेल्वे स्टेशनवर या एक्स्प्रेसला थांबा मिळावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. दौंडला थांबा दिला, तर येथून पुणे-मुंबई हा प्रवास जलद गतीने होऊ शकतो. तसेच दौंड, बारामतीसह शेजारील अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांना या एक्स्प्रेसचा चांगलाच फायदा होणार आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने अधिकृतरीत्या या एक्स्प्रेसला दौंडला थांबा नसल्याचे दौंड रेल्वे स्टेशन मास्तर जगन्नाथ त्रिपाठी यांनी सांगितले.
केवळ पहिल्या फेरीपुरता या एक्स्प्रेसला दौंड रेल्वे स्टेशनवर दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. भविष्यात या
एक्स्प्रेसला दौंडला थांबा होऊ शकतो. परंतु अद्याप आमच्याकडे रेल्वे प्रशासनाकडून थांबा देण्याबाबत अधिकृत सूचना मिळालेल्या नाहीत. जगन्नाथ त्रिपाठी, स्टेशन मास्तर, दौंड