पुणे : आवर्तनाचे नियोजन नसल्याने शेतकरी संभ्रमात | पुढारी

पुणे : आवर्तनाचे नियोजन नसल्याने शेतकरी संभ्रमात

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा :  चासकमान डाव्या कालव्याच्या दुसर्‍या व तिसर्‍या आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर नसल्याने खेड व शिरूर तालुक्यातील रब्बीसह उन्हाळी पिकांच्या सिंचनाचे नियोजन कोलमडणार आहे. डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या बागायती क्षेत्रातील शेतकरी धास्तावले आहेत. सध्या सुरू असलेले पहिले आवर्तन 20 फेब्रुवारीला संपणार असून, प्रकल्प प्रशासनाने पुढचे वेळापत्रक तत्पूर्वी जाहीर करावे अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

पुणे पाटबंधारे मंडळ यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील धरणांच्या पाण्याचे शेती सिंचनासाठी (आवर्तन) नियोजन केले जाते. पालकमंत्री व स्थानिक लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहून निर्णय घेतात. चासकमान प्रकल्पाच्या कालवे सल्लागार समितीची रब्बी हंगामासाठीची अशी बैठक 25 नोव्हेंबर 2022 ला झाली. मात्र त्यात सध्या सुरू असलेले आवर्तन सुरू व बंद करण्यापलीकडे काही निर्णय झाल्याचे अधिकारी सांगत नाहीत. 22 डिसेंबर 2022 ला सुरू झालेले आवर्तन 20 फेब्रुवारीला थांबणार आहे. पुढील दोन्ही आवर्तनांचे नियोजन नोव्हेंबर महिन्यातच जाहीर होण्याची गरज असते.

त्यानुसार शेतकरी पिकांचे नियोजन करतात; मात्र या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत स्थानिक आमदार किंवा लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने अनुपस्थित राहतात आणि त्याचा निर्णय होऊ शकत नाही अशी चर्चा आहे. दोन तालुक्यांतील एक-एक शेतकरी प्रतिनिधी या बैठकीला निमंत्रित करावा, अशी मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. शिवाय अधिकारी याबाबतीत कोणत्याही प्रकारची माहिती प्रसिद्ध करीत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांना पिकांचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत.  चासकमान कालव्याच्या पाण्यावर आधारित खेड व शिरूर तालुक्यात 44 हजार 170 हेक्टर क्षेत्र रब्बी हंगामात व उन्हाळ्यात बागायती झाले आहे. त्यात कांदा, बटाटा, भाजीपाला, तरकारी पिके घेतली जातात. सिंचन यंत्रणेने कर्जबाजारी आणि प्रत्यक्ष सिंचनाच्या अनियोजित वेापत्रकामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रकल्प प्रशासनाने आवर्तने जाहीर करणे गरजेचे आहे.

Back to top button