पुणे : मिनी विधानसभेला मुहूर्त मिळेना !

पुणे : मिनी विधानसभेला मुहूर्त मिळेना !

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा :  ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बार महिनाभरात उडेल, असेच वाटत होते. परंतु, या निवडणुकांच्या बाबतीत अद्यापही सर्व काही शांत आणि आलबेल असल्याचेच दिसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार तरी कधी? असा सवाल आता सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जात आहे. त्यातच या निवडणुकांकडे इच्छुकांचेदेखील डोळे लागले आहेत.

अनेक इच्छुकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्यालाच उमेदवारी मिळेल या हेतूने सर्व प्रकारची जय्यत तयारी करून ठेवली आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस, जागरण-गोधळ व इतर सर्वच छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना निमंत्रण मिळताच अगदी वेळेत हजेरी लावणे सुरू ठेवले आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाचा पुरेपूर उपयोग करून मतदारसंघात संपर्कही वाढवत आहेत; परंतु सरकारच्या माध्यमातून या निवडणुकांसंदर्भात काहीच निर्णय होत नसल्याने इच्छुकांच्या नजरा आता निवडणुका केव्हा जाहीर होणार याकडे लागल्या आहेत.

राज्यात सहा महिन्यांपूर्वी ठाकरे सरकार (महाविकास आघाडी) जाऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्याबरोबर जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या संख्येचा निर्णय बदलण्यात आला. मंत्रिमंडळाने जिल्हा परिषद गटांची रचना सन 2017 मधील निवडणुकांप्रमाणे ठेवण्याचा निर्णय घेतला. शासनपातळीवरील गुंतागुंतीमुळे मुदत संपूनही या निवडणुका वरचेवर लांबत आहेत. ग्रामीण भागातील गावांच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती या संस्थांकडे पाहिले जाते. मात्र, सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने आता याचा फटका ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे. यामुळे अनेक विकासकामे ठप्प झालेली आहेत, तर अनेक इच्छुकांना राजकीय निर्णय घेणे अवघड बनले आहे. या निवडणुका केव्हा लागतील याविषयी अजून तरी सर्वत्र शांतताच दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर तत्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

logo
Pudhari News
pudhari.news