पुणे : राज्यात 15 फेब्रुवारीनंतर उन्हाचा कडाका वाढणार | पुढारी

पुणे : राज्यात 15 फेब्रुवारीनंतर उन्हाचा कडाका वाढणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात सध्या थंडीचे प्रमाण कमी असले तरी पुढील तीन दिवसानंतर पहाटे व रात्रीच्या थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र 15 फेब्रुवारीनंतर थंडी पूर्णपणे कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर भारतात पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे दाट धुके तसेच तीव्र थंडीची लाट, त्याचबरोबर बहुतांश राज्यात पाऊस पडत आहे. मात्र या भागाकडून राज्याकडे येणार्‍या थंड वार्‍यांमध्ये चढ-उतार होत आहेत.

त्यामुळेच राज्यातील तापमानातदेखील वाढ आणि घट होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 2 डिग्री वाढीमुळे असलेला ऊबदारपणा हा तसाच जाणवत आहे. 13 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा हळूहळू पहाटे व रात्रीच्या थंडीत वाढ होणार असली तरीही दिवसाच्या तापमानात 15 फेब्रुवारीनंतर मोठी वाढ होईल, असाही अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सध्या बहुतांश शहरांचे कमाल तापमान 31 ते 33 अंशांवर असून ते 36 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.

Back to top button