पिंपरी : ‘आप’च्या उमेदवारासह सात अपक्षांचे अर्ज बाद | पुढारी

पिंपरी : ‘आप’च्या उमेदवारासह सात अपक्षांचे अर्ज बाद

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण 40 इच्छुकांनी उमेदवारीअर्ज भरले होते. त्या अर्जाच्या छाननीत आम आदमी पार्टीसह सात अपक्षांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आता 33 उमेदवारांचे अर्ज राहिले आहेत.
उमेदवारी अर्जाची बुधवारी (दि. 8) छाननी करण्यात आली. त्यात भाजपच्या अश्विनी जगताप यांचा अर्ज वैध ठरल्याने डमी (पर्यायी) उमेदवार शंकर जगताप यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीचे मनोहर पाटील यांचा पक्षाचा बी फॉर्म अपूर्ण असल्याने त्याचा अर्ज बाद करण्यात आला आहे. त्यामुळे आपचे आव्हान निवडणुकीपूर्वीच संपुष्टात आले आहे.

अपक्ष चेतन ढोरे यांनी प्रतिज्ञापत्र अपूर्ण सादर केल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे. अपक्ष गणेश जोशी यांच्या अर्जावर पुरेशा सूचकांच्या सह्या नसल्याने अर्ज बाद केला आहे. अपक्ष उमेश म्हेत्रे यांनी सूचक म्हणून मतदार संघाबाहेरील नावे दिल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आहे. अपक्ष प्रशांत बालवडकर यांचा अर्ज अपूर्ण असल्याने तो बाद करण्यात आला आहे. अपक्ष संजय मागाडे यांनी अनामत रक्कम न भरल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.

असे एकूण 7 जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे 40 पैकी 33 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीयीकृत पक्षाचे 2 उमेदवार आहेत. तर, नोंदणीकृत असलेल्या बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन भारत पार्टी, संभाजी ब्रिगेड पार्टी, महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी व आजाद समाज पार्टी या पक्षाचे 5 उमेदवार आणि अपक्ष 26 उमेदवार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार
भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यासह 33 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. या वैध उमेदवारांना गुरुवार (दि.9) व शुक्रवार (दि.10) या दोन दिवसांत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. या मुदतीत कोणते उमेदवार माघार घेणार, यावरून प्रत्यक्ष लढत स्पष्ट होणार आहे. दोन दिवसांत कोण कोण अर्ज मागे घेतो, याची उत्सुकता लागली आहे. पोटनिवडणुकीसाठी मतदान 26 फेब्रुवारीला होणार असून, 2 मार्चला निकाल जाहीर होणार आहे.

Back to top button