मंचर : नंदुरबारला जाऊ; हिरड्याच्या प्रश्नाला आता वाचा फोडूच | पुढारी

मंचर : नंदुरबारला जाऊ; हिरड्याच्या प्रश्नाला आता वाचा फोडूच

मंचर; पुढारी वृत्तसेवा : आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित हे आदिवासींच्या विकासाची भूमिका घेण्याऐवजी आदिवासीविरोधी भूमिका घेत आहेत. त्याचा त्यांना जाब विचारण्यासाठी शुक्रवारी (दि. 10) नंदुरबार येथील त्यांच्या घरावर आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. किसान सभेचे पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे यांनी ही माहिती दिली.

राज्यामध्ये आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. बोगस आदिवासींपासून ते आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूपर्यंत समस्यांची रांग लागली आहे. या सर्व गोष्टींकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. आदिवासी विकासमंत्री हे आदिवासींच्या विकासाची भूमिका घेण्याऐवजी आदिवासीविरोधी भूमिका घेत आहेत.

आदिवासी विशेष भरती तत्काळ सुरू करण्यात यावी व आदिवासींच्या जागा बळकाविलेल्या बोगसांवर कायदेशीर कारवाई व्हावी, आदिवासी वसतिगृहांतील व आदिवासी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न तत्काळ सोडवावेत, प्रलंबित वनहक्क दावे तत्काळ मंजूर करावेत, चुकीच्या पद्धतीने फेटाळलेले दावे मंजूर करा, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा असणार आहे.

याबरोबरच पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील नागरिकांचे मुख्य उत्पन्नाचे साधन असलेल्या बाळहिरडा या गौण वनउपजाची मागील चार वर्षांपासून आदिवासी विकास महामंडळ यांनी खरेदी करणे थांबविले आहे. त्यामुळे हिरड्याचे भाव कमालीचे पडले आहेत.

ही बाळहिरडा खरेदी त्वरित सुरू करावी, खासगी जमिनीवर जी हिरडाझाडे आहेत, त्याची नोंद सातबारा उतार्‍यावर व्हावी, आदिवासी वनहक्क कायदा व पेसा कायदा यांच्या माध्यमातून नागरिक, ग्रामसभेला हिरडा खरेदी-विक्री, लिलाव, वाहतूक याविषयी जे हक्क मिळाले आहेत, त्याचे सरंक्षण व्हावे आदी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

यामध्ये सामील व्हावे, असे आवाहन आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच, पुणे जिल्हा किसान सभा यांनी केले आहे. किसान सभेचे डॉ. अमोल वाघमारे, अ‍ॅड. नाथा शिंगाडे, विश्वनाथ निगळे, अशोक पेकारी, संतोष कांबळे, लक्ष्मण जोशी, आमोद गरुड, राजू घोडे यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.

Back to top button