

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सेक्टर 12 मधील गृहप्रकल्पाच्या सोडतीत घर न मिळालेल्या नागरिकांना त्यांनी भरलेली 10 टक्के आगाऊ रक्कम अद्याप मिळालेली नाही. 254 नागरिकांची सुमारे पावणेदोन कोटींपेक्षा अधिक रक्कम पीएमआरडीएकडे सध्या अडकून आहे. तांत्रिक कारणांमुळे ही रक्कम देण्यास विलंब झाला. तथापि, येत्या दोन दिवसांमध्ये ही रक्कम अदा केली जाणार असल्याचे पीएमआरडीए प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी पीएमआरडीएने पेठ क्रमांक 12 येथे गृहप्रकल्प उभारलेला आहे. त्यामध्ये एकूण 4 हजार 883 सदनिकांसाठी सुरुवातीला सोडत काढण्यात आली. त्यातील शिल्लक राहिलेल्या मध्यम उत्पन्न प्रवर्गातील (एलआयजी) 793 सदनिकांसाठी तसेच, ईडब्ल्यूएस गटातील 31 सदनिकांसाठी पुन्हा सोडत काढण्यात आली. त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याकरिता 12 डिसेंबरपर्यंत मुदत होती. त्यानंतर 15 डिसेंबर 2022 ला विजेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
त्यानंतर पुढील 15 दिवसांमध्ये ज्या नागरिकांना सोडतीमध्ये घर लागले नाही त्यांच्या बँक खात्यावर 10 टक्के रक्कम येणे अपेक्षित होते. मात्र, फेब्रुवारी उजाडूनही अद्याप 254 नागरिकांना आगाऊ घेतलेली 10 टक्के रक्कम मिळालेली नाही. सोडतीमध्ये घर न लागलेल्या नागरिकांना प्रत्येकी सरासरी 74 हजार रुपये याप्रमाणे 10 टक्के रक्कम परत मिळणार आहे.
सुमारे अडीचशे नागरिकांचे पैसे परत करणे बाकी आहे. तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांनी भरलेली 10 टक्के रक्कम देणे बाकी आहे. ही रक्कम पावणेदोन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. येत्या दोन दिवसांमध्ये नागरिकांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येईल.
– बन्सी गवळी, सहआयुक्त