पिंपरी : ‘ईव्हीएम’वरील बॅलेट युनिटची संख्या वाढणार | पुढारी

पिंपरी : ‘ईव्हीएम’वरील बॅलेट युनिटची संख्या वाढणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल 40 जणांनी उमेदवारीअर्ज भरले होते. त्यातील 7 जणांचे अर्ज बाद झाल्याने 33 जण शिल्लक आहेत. पंधरापेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यास एकापेक्षा अधिक बॅलेट युनिट वापरावे लागणार आहेत. त्यामुळे मतदानासह मतमोजणीस अधिक वेळ लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनला (ईव्हीएम-मतदान यंत्र) उमेदवारांचे नाव व चिन्ह असलेली बॅलेट युनिट (मतदान पत्रिका) जोडलेली असते.

तसेच, एक कंट्रोल युनिट जोडलेले असते. तर, व्हीव्हीपॅडमधून स्लिप बाहेर येते. एका बॅलेट युनिटवर जास्तीत जास्त 15 उमेदवारांची नावे असतात. एक नोटाचे बटण असते. असे एकूण 16 बटणे बॅलेट युनिटवर असतात. पंधरापेक्षा अधिक उमेदवार झाल्यास एकापेक्षा अधिक बॅलेट युनिट वापरावे लागणार आहेत. सर्व 33 उमेदवार रिंगणात कायम राहिल्यास तीन बॅलेट युनिट वापर करावा लागणार आहे. पुणे जिल्ह्यात चिंचवड मतदारसंघ सर्वांत मोठा असून, एकूण 510 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे बॅलेट युनिटची संख्या दुप्पटीने वाढणार आहे.
उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे प्रत्येक ईव्हीएमध्ये सर्व उमेदवारांच्या नावांचा समावेश करावा लागणार आहे. ते मशिन कर्मचार्‍यांकडेे देताना त्याचा डेमो दाखविला जातो. त्यानंतर ते सील केले जातात. तसेच, प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी प्रत्यक्ष मतदान करून ते डिलीट केले जातात. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीस सुुरुवात होते.

बॅलेट युनिटची संख्या वाढल्याने मशिन ताब्यात घेण्यापासून मतमोजणीच्या वेळी निवडणूक कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढणार आहे. तसेच, मतमोजणीसाठी अधिकचा वेळ जाणार आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

थेरगावच्या कामगार भवनात मतमोजणी
पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशिन थेरगाव येथील शंकरराव गावडे कामगार भवन येथे ठेवण्यात येणार आहेत. तेथे कंट्रोल रूम तयार केले जाणार आहे. तसेच, त्याच ठिकाणी 2 मार्चला मतमोजणी केली जाणार आहे. ते ठिकाण ग क्षेत्रीय कार्यालयाजवळ आहे.

 

Back to top button