बारामती : शिलालेखामुळे पणदरेच्या इतिहासाला उजाळा | पुढारी

बारामती : शिलालेखामुळे पणदरेच्या इतिहासाला उजाळा

बारामती; पुढारी वृत्तसेवा : पणदरे (ता. बारामती) गाव ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणून ओळखले जाते. गावातील अनेक ऐतिहासिक मंदिरे, शिलालेख हे इतिहासाची साक्ष देतात. शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक अनिल दुधाने यांनी नुकतेच केले. त्यामुळे गावच्या इतिहासाला उजाळा मिळाला आहे. शिलालेखानिमित्त पणदरे व येथील जगताप घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होत आहे.

शिलालेख वाचनासाठी दुधाने यांना बारामती परिसराचा इतिहास उजेडात आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या विनोद खटके व मनोज कुंभार या विद्या प्रतिष्ठानच्या दोन शिक्षकांचे सहकार्य मिळाले. याशिवाय राम वाघोले ,अनिकेत राजपूत, राहुल भोईटे यांचीही मदत झाली. पणदरेत मुख्य गावठाणात श्री सोमेश्वर महादेव मंदिराच्या उजव्या बाजूला एक शिलालेख कोरला आहे. तो उठाव स्वरूपाचा असून, सात ओळींचा शुद्ध मराठी भाषेत मजकूर आहे. शिलालेखाची अक्षरे ठळक असून, सुस्पष्टपणे वाचता येतात.

त्यावर रविवार, 13 मार्च 1774 या दिवशी श्री सोमेश्वर महादेव चरणी तत्पर असलेल्या सुपे परगण्यातील मौजे पणदरे येथील गावाचे पाटील महादजीचा त्याचा पुत्र गिरजोजी पाटील त्याचा पुत्र जानराव पाटील जगताप यांचा घुमट बांधला, असा उल्लेख आहे. जानराव पाटील यांचा हा घुमट (समाधी) आहे. पण हा समाधी घुमट नक्की कोणी बांधला याची माहिती शिलालेखात नाही. घुमट बांधल्याची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने तो कोरला आहे.

जगताप घराण्याचा ऐतिहासिक वारसा
सुपे परगण्यात मोकदम पाटील महादजी यांच्याकडे पणदरेची पाटीलकी असल्याचेही यावरून स्पष्ट होते. हे घराणे शिवपूर्वकालापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी चिंचवडचे मोरया गोसावी यांना पणदरे गाव इनाम दिल्याचे 1649 चे पत्र उपलब्ध आहे. पुरंदरच्या लढाईत किल्ल्याच्या पायथ्याशी जी लढाई झाली त्यात मुसेखान गोदाजी जगताप यांच्याकडून ठार झाला, तर फत्तेखान बेलसरकडे पळून गेला. त्या लढाईत नंदाजी जगताप शिवरायांकडून लढले असा उल्लेख आहे.

सुप्याच्या पाटीलकीच्या वादाबद्दल शिवाजी महाराजांनी जगतापांची कानउघडणी केली ते 6 मार्च 1676 पत्र उपलब्ध आहे. पत्रात राजेश्री रामोजी जगताप व खंडोजी जगताप यांचे नाव आलेले आहे. येथील कोकरे (धनगर) व जगताप (मराठा) यांच्याकडे छत्रपती शाहू व पेशवाईत निमपाटीलकी राहिली. शहाजीराजे यांच्या जहांगिरीतील सासवडमधील 10 गावांची देशमुखी जगतापांकडे होती. त्यात बारामती परिसरातील होळ, मुरूम, वाकी, वाणेवाडी, पणदरे आदींचा उल्लेख आहे.

Back to top button