पिंपरी : शहरात आजपासून बालसुरक्षा अभियान | पुढारी

पिंपरी : शहरात आजपासून बालसुरक्षा अभियान

पिंपरी : शहरातील बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यासाठी शहरामध्ये गुरुवारपासून (दि. 9) बाल सुरक्षा अभियान- जागरुक पालक, सदृढ बालक अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये अंदाजे 4 लाख 22 हजार विद्यार्थी व बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी केली जाणार आहे. राज्यातील शून्य ते 18 वर्षे वयोगटातील सर्व बालक व किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यासाठी बाल सुरक्षा अभियान-जागरुक पालक, सुदृढ बालक अभियान राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत महापालिका प्रशासनाला 26 जानवोरी रोजी याबाबत पत्रान्वये कळविण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत हे अभियान पुढील दोन महिने कालावधीसाठी राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये या अभियानांतर्गत शासकीय, अनुदानित, खासगी शाळा, मनपा व खासगी अंगणवाडी, बालवाडी अशा एकुण 1982 शाळा/अंगणवाडीमधील वय वर्षे शून्य ते 18 वयोगटामधील एकूण अंदाजे 4 लाख 22 हजार विद्यार्थी व बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी पथके नियुक्त केली आहे.

वैद्यकीय तपासणी पथकांमार्फत शाळा व अंगणवाड्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तरी, या अभियानांतर्गत आपल्या पाल्यांची पालकांनी शाळेमधून आरोग्य तपासणी करुन घ्यावी. त्यासाठी वैद्यकीय विभागामार्फत शाळांमध्ये आरोग्य तपासणीचा दिवस निश्चित करुन देण्यात येईल. आरोग्य तपासणीच्या दिवशी विद्यार्थी शाळेत, अंगणवाडीत उपस्थित राहतील याची दक्षता पालकांनी घ्यावी, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

Back to top button