

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कचरा संकलन सेवाशुल्कासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक घरातून दरमहा 60 रुपये द्यावे लागणार आहेत. त्याची अंमलबजावणी प्रशासकीय राजवटीत 1 एप्रिल 2023 पासून केली जाणार आहे. मिळकतकर बिलात वर्षभराची रक्कम समाविष्ट करून या शुल्काची वसुली केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या 8 एप्रिल 2016 च्या अधिसूनचेनुसार घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 लागू करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने घंटागाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा दररोज जमा केला जातो. कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिकेने जनजागृतीसाठी संस्थांही नेमल्या आहेत. कचरा संकलनासाठी पालिका दरवर्षी कोट्यवधीचा खर्च करते.
राज्य शासनाच्या 1 जुलै 2019 च्या स्वच्छता व आरोग्य उपविधी अनुसूचीनुसार सर्व महापालिकांसाठी उपयोगकर्ता शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यानुसार, पालिकेच्या 20 ऑक्टोबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत नागरिकांकडून सेवाशुल्क वसुलीला मंजुरी देण्यात आली आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजवाणी प्रशासकीय राजवटीत 1 एप्रिल 2023 पासून होईल. त्या शुल्काची आकारणी मिळकतकर बिलात समाविष्ट करून त्यांची वसुली केली जाणार आहे.
दरम्यान, मिळकतकरात वृक्ष उपकर, मलप्रवाह सुविधा लाभकर, पाणीपुरवठा लाभकर, रस्ता कर, शिक्षण कर वसूल केला जातो. आता नव्याने कचर्यासाठी सेवा शुल्क का लावला जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी खटाटोप
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात कचरा संकलनाच्या सेवेसाठी शुल्क वसूल करण्याची अट आहे. त्यासाठी तब्बल 350 गुण आहेत. त्यासाठी महापालिका हे शुल्क लागू करत आहे. तसेच, ओल्या कचर्याची कंपोस्टिंगद्वारे खतनिर्मिती करणार्या हाउसिंग सोसायट्यांना हे शुल्क आकारले जाणार नाही, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे
महापालिकेने नियुक्त केलेल्या घंटागाडीत ओला व सुका कचरा वेगवेगळा द्यावा. रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच, 1 एप्रिलपासून कचरा संकलनासाठी सेवाशुल्क आकारले जाणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
असे आहे दरमहा सेवाशुल्क
प्रकार – रुपये
घर – 60
दुकान, दवाखाने – 90
फर्निचर, ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स शोरूम – 160
गोदाम – 160
हॉटेल – 160
राहण्याची व जेवणाची व्यवस्था असलेले हॉटेल – 200
50 बेडचे रुग्णालय – 160
50 पेक्षा अधिक बेडचे रुग्णालय – 240
शैक्षणिक संस्था, वसतिगृह – 120
धार्मिक संस्था – 120
मंगल कार्यालय, चित्रपटगृह – 2 हजार
खरेदी केंद्र, मल्टिप्लेक्स थिएटर – 2 हजार
फेरीवाले – 180
हंगामी दुकान, आनंद मेळा, सत्संग, खाद्य महोत्सव, फटाक्याचे दुकान- एक वेळचे शुल्क