कसबा पेठ पोटनिवडणूक : भाजप सज्ज, मविआही तयार | पुढारी

कसबा पेठ पोटनिवडणूक : भाजप सज्ज, मविआही तयार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाने शहरातील पक्षाची सर्व यंत्रणा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्याचे नियोजन केले आहे, तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपने प्रचारासाठी बुधवारी पदयात्रा काढली, तर काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ आज (गुरुवार) होत आहे.

काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचाराचा प्रारंभ तांबडी जोगेश्वरी मंदिरापाशी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज सकाळी होणार असल्याचे पक्षाचे निवडणूक निरीक्षक आमदार संग्राम थोपटे आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले. दुसर्‍या बाजूला भाजपच्या प्रचारासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार आज सकाळी ओंकारेश्वर मंदिरापाशी उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी यासाठी त्यांची काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बुधवारी भेट घेतली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनंतर थोपटे, शिंदे, अभय छाजेड, कमल व्यवहारे, अजित दरेकर यांनी दाभेकरांशी चर्चा केली. त्या वेळी राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, दीपक मानकर हेही उपस्थित होते. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे दाभेकर यांनी आश्वासन दिल्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.

भाजपने आजी-माजी आमदारांवर, तसेच शहरातील अन्य मतदारसंघातील कार्यकर्त्यांवर कसबा पेठेतील प्रभागनिहाय प्रचाराची धुरा सोपविली आहे. शहरातील अन्य भागातील नगरसेवकांवरही बूथनिहाय जबाबदारी निश्चित केली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीला मतदारसंघाबाहेरीलही स्थानिक नेत्यांची फौज उभी राहणार आहे. वरिष्ठ नेत्यांचेही लक्ष या मतदारसंघावर राहणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघांतील प्रचाराची दिशा निश्चित केली जाणार आहे. शिवसेनेचे कार्यकर्तेही सक्रिय झाले आहेत.

दोन्ही पक्षांची धाव केसरीवाड्याकडे
दिवंगत आमदाप मुक्ता टिळक यांचे पती शैलेश किंवा मुलगा कुणाल यांना भाजपची उमेदवारी हवी होती. त्यांना ती मिळाली नाही. काँग्रेसकडून रोहित टिळक यांनी दोनदा निवडणूक लढविली. त्यांचेही नाव चर्चेत होते. टिळक कुटुंबियांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, ब्राह्मण समाजाला उमेदवारी नसल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. त्यामुळे सर्वच नेते केसरीवाड्यात भेटीला जाऊ लागले. काँग्रेसच्या उमेदवारांसह नेते आज प्रचाराला प्रारंभ केल्यानंतर केसरीवाड्यात जाणार आहेत. त्याच वेळी भाजपच्या उमेदवारांसह मंत्री मुनगंटीवारही आज केसरीवाड्यास भेट देणार असल्याचे भाजपतर्फे सांगण्यात आले.

Back to top button