पुणे : लग्नकार्यात डच गुलाबाचा हार फेव्हरेट | पुढारी

पुणे : लग्नकार्यात डच गुलाबाचा हार फेव्हरेट

 शंकर कवडे

पुणे : लग्नसोहळा साधा असो की शाही, त्यामध्ये पुष्पहार हा प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय ठरतो. त्यामुळे बहुतांश लग्नकार्यांत वर-वधूकडून डच गुलबाच्या पाकळ्यांच्या हाराला सर्वाधिक पसंती मिळते. पूर्वी लग्नामध्ये लाल डच गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले हार वर-वधूच्या गळ्यात दिसून येत होते. मात्र, मागील काही महिन्यांत लाल पाकळ्यांचा हार घेण्याचा ट्रेंड मागे पडत असून, डच गुलाबाच्या हारांना जास्त पसंती मिळत आहे. परिणामी, विविध रंगी 20 फुलांच्या गड्डीचे दरही लालच्या तुलनेत दुपटीने वाढून 400 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

सणापासून समारंभापर्यंत प्रत्येक कार्यक्रमात सजावटीपासून केशरचनेचे सौंदर्य खुलविण्यासाठी फुलांचा वापर वाढल्याचे बाजारात फुलांना होत असलेली मागणी व मिळणारे दर, यांवरून दिसून येत आहे. पूर्वी लाल गुलाबाच्या पाकळ्यांना जास्त मागणी असल्याने बाजारात या फुलांचे दर जास्त प्रमाणात होते. मात्र, सध्या ट्रेंड बदलल्याने आता विविधरंगी फुलांनाही चांगली मागणी होत आहे.

त्यामुळे ऐन लग्नसराईत भाव खाणारे लाल डच गुलाब आता मागे पडले आहे. तर, विविधरंगी डच गुलाब बाजारासह लग्नसराईत भाव खात आहेत. मार्केट यार्डातील घाऊक फुलबाजारात जिल्ह्यातील खेड शिवापूर, शिक्रापूर, मावळ, तळेगाव (दाभाडे) येथून डच गुलाब बाजारात दाखल होत असून, यामध्ये लाल रंगासह पांढर्‍या, पिवळ्या, गुलाबी, निळसर आदी आकर्षक फुलांचा समावेश आहे.

डच गुलाबाच्या पाच हजार जुड्यांची आवक
बाजारात 20 फुलांच्या डच गुलाबांच्या पाच हजार जुड्यांची सरासरी आवक होते. यामध्ये 60 ते 70 टक्के फुले ही लाल, तर उर्वरित 20 ते 30 टक्के फुले विविधरंगी असतात. सध्या लग्नसराई व व्हॅलेंटाइन वीक सुरू असल्याने लाल डच गुलाबाच्या गड्डीला 200 ते 220 रुपये दर मिळत आहे. रंगीत फुलांना 300 ते 400 रुपये दर मिळत आहे. लग्नसराईत पारंपरिकसह पाश्चिमात्त्य पध्दतीने केलेल्या सजावटीसह वर-वधूंचा पेहराव खुलून दिसण्यासाठी डच गुलाबासह पाकळ्यांच्या पुष्पहाराचा वापर वाढल्याने शेतकरीवर्गानेही विविधरंगी फुलांची लागवड करण्यास सुरुवात केल्याचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.

जिप्सोफिलाच्या हारालाही पसंती
लग्नसमारंभात वधू-वरांनी केलेल्या पेहरावार खुलून दिसेल अशा हारांमध्ये जिप्सोफिलाच्या हाराचाही ट्रेंड आहे. नववधूच्या केशरचनेसह पुष्पहारासाठी या फुलांचा वापर करण्यात येत आहे. जिप्सोफिलाच्या फुलांचा वापर वाढल्याने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत बंगळुरू, बारामती आणि सातारच्या काही भागांतून जिप्सो मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे. फुलबाजारात दररोज दहा काड्यांच्या तीनशे गड्ड्यांची आवक होत असलेल्या या फुलाला घाऊक बाजारात एका गड्डीला सरासरी 700 ते 800 रुपये भाव मिळतो. तर, एरवी सरासरी 100 ते 400 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.

पूर्वी लग्नात गुलछडी, गुलाब व लिली आदी फुलांचे हार चालत होते. त्यानंतर लाल डच गुलाबांच्या पाकळ्यांच्या हाराचा ट्रेंड आला. आता गुलाबी, पिवळा, पांढरा गुलाब तसेच त्यांच्या पाकळ्यांसह जिप्सोफिलाच्या हारांबाबत विचारणा होत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार हार तयार करून देण्यात येतात. साधारणत: दोन हारांची तीन चे सहा हजारांपर्यंत विक्री करण्यात येते.
                                                    – संजय गाडे, हार विक्रेते

कोरोनाकाळात लग्नसराईवर मर्यादा आल्याने या काळात बहुतांश शेतकर्‍यांनी गुलाबांचे उत्पादन थांबविले. लालच्या तुलनेत रंगीत फुलांची आवक खूपच कमी आहे. त्यामुळे रंगीबेरंगी फुलांच्या वीस नगांचे दर 400 रुपयांवर गेले आहेत. लग्नसराईत सध्या लाल डच गुलाबांच्या पाकळ्यांचा ट्रेड मागे पडत असून, रंगीत पाकळ्यांसह गुलाबांच्या हारांना पसंती मिळत आहे. त्यामुळे या फुलांना मागणी वाढून दरही चांगले मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधान आहे.

                                                           – विठ्ठल उमाप, डच गुलाब उत्पादक
                                                         शेतकरी, जातेगाव बुद्रुक, शिक्रापूर

Back to top button