पुणे : समुद्री वादळांनी पळवली थंडी; जिल्ह्यात यंदा कडाका जाणवलाच नाही | पुढारी

पुणे : समुद्री वादळांनी पळवली थंडी; जिल्ह्यात यंदा कडाका जाणवलाच नाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर, पिंपरी -चिचवडसह संपूर्ण जिल्ह्यातील थंडीच्या आकडेवारीचा ताळेबंद तपासला असता 2016 नंतर थंडीत घट झाली आहे. नव्वदच्या दशकात जिल्ह्यातील बहुतांश शहरासह गावांचे किमान तापमान डिसेंबरमध्ये 3.5 अंशांपर्यंत खाली गेले होते. यंदा मात्र किमान तापमान 8.5 अंशांच्या खाली गेले नाही. समुद्री वादळांनी जिल्ह्यातील थंडी पळवली असून, सतत ढगाळ वातावरणामुळे यंदाही थंडीचा कडाका जाणवलाच नाही.

यंदा दिवाळीपर्यंत म्हणजे 25 ऑक्टोबरपर्यंत मान्सून जोरदार बरसत होता. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस सुरू होता. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी पडलीच नाही. दरवर्षी डिसेंबर महिन्यात पुणे शहर,पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यात कडाक्याची थंडी असते. या गुलाबी थंडीच्या आनंदाला यंदा नागरिक मुकले. कारण, डिसेंबरमध्ये जेमतेम आठ ते दहा दिवस थंडीचे होते.

त्यातही 15 डिसेंबर रोजी 8.2 अंश इतके तापमान खाली आले. मात्र, सतत येणार्या चक्रीवादळांनी ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि डिसेंबर थंडीविनाच गेला. जानेवारी महिन्यातही असेच झाले. या महिन्यातही ढगाळ वातावरणाने निराशा केली. किमान तापमानाचा पारा 10 अंशांपर्यंत खाली आला. फेब्रुवारी उजाडताच दिवसा कमाल तापमानाचा पारा वाढून 33 अंशांवर गेला. रात्री व पहाटे किमान तापमान 11 ते 12 अंशांवर स्थिर आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळा संपत असतानाही कडाक्याची थंडी पडलीच नाही.

43 वर्षांतला पाचवा उष्ण हिवाळा…
भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार यंदाचा हिवाळा हा गेल्या
43 वर्षांतील पाचवा उष्ण हिवाळा ठरला आहे. यंदा पाऊस 108 टक्के पडला, तरीही हिवाळा मात्र जाणवला नाही.

जिल्ह्यातील थंडीचा आलेख
डिसेंबर ः कडाक्याच्या थंडीचे दिवस 10 (किमान तापमान 8 अंश)
जानेवारी ः थंडीचे दिवस 7 (किमान तापमान 9 अंश)
8 फेब्रुवारीपर्यंत ः थंडीचे दिवस 4 (किमान तापमान 8.1)

जिल्ह्याच्या रेकार्ड ब्रेक किमान तापमानाचा आलेख..
-1 फेब्रुवारी 1934 (3.9 अंश)
-11 डिसेंबर 1970 (3.6 अंश)
– 12 डिसेंबर 1970 (3.9 अंश)
-11 डिसेंबर 1987 (4.7 अंश)

ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम गेल्या चार ते पाच वर्षांपासून पुणे जिल्ह्यावरही झाला आहे. हिंदी महासागराचे तापमान इतर महासागरांच्या तुलनेत जास्त वाढत आहे. ते पाणी तापले की हवेचे दाब कमी होऊन वार्यांची चक्रीय स्थिती निर्णाण होत आहे. हे चक्र सतत वाढतच आहे. यंदा हवेचे दाब खूप वेळा कमी-जास्त झाले तसेच ढगाळ वातावरणामुळे थंडीला मोठा अडथळा निर्माण झाला.

              – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ

15 फेब्रुवारीनंतर उन्हाचा चटका…
हवामानतज्ज्ञांच्या मते, येत्या 15 फेब्रुवारीपासून हिवाळा संपणार असून, कमाल तापमानात एकदम वाढ होईल. जिल्हयाचे कमाल तापमान 31 वरून एकदम 35 ते 36 अंशांवर जाईल तसेच रात्री व पहाटेचे किमान तापमानही वाढेल.

समुद्री वादळांची संख्या वाढली…
गेल्या पाच वर्षांत समुद्री वादळांची संख्या वाढल्याचे हे परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदा बंगालच्या उपसागरात असानी, मंदोस, सीतरंग ही चक्रीवादळे आली तसेच कमी दाबाचे पट्टे सतत तयार झाल्याने ढगाळ वातवरण निर्माण झाले. त्यामुळे हिवाळ्याचा कालावधी घटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Back to top button