पुणे : फुरसुंगी, उरुळी देवाची गावे वगळण्यास मंजुरी | पुढारी

पुणे : फुरसुंगी, उरुळी देवाची गावे वगळण्यास मंजुरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे महापालिका हद्दीतून वगळण्याचा प्रस्ताव बुधवारी शहर सुधारणा समितीने मंजूर केला. यामुळे गावे वगळण्याच्या प्रक्रियेस प्रशासकीय पातळीवर सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार येथील कचरा डेपो मात्र महापालिकेच्याच हद्दीत ठेवला आहे.

राज्य शासनाने 2017 मध्ये महापालिका हद्दीलगतच्या फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांसह 11 गावांचा समावेश महापालिकेत केला. यानंतर महापालिकेने समाविष्ट गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली. काही कामे सुरूही आहेत. शिवाय फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथे टी. पी. स्कीमचेही नियोजन केले आहे. या स्कीमला शासनाची मंजुरी मिळाली आहे.

दरम्यान, या गावांना महापालिकेने आकारलेला कर जास्त आहे तसेच पालिकेकडून कोणत्याही सोयीसुविधा मिळत नाहीत, असा आरोप करीत फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही गावे वगळण्याची घोषणा केली. मात्र, शासनाकडून त्याबाबत कोणतेही आदेश काढले नाहीत.

ही गावे वगळण्यासाठी महापालिकेने ठराव करून शासनास प्रस्ताव पाठवावा लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात आहे. हे इतिवृत्त महापालिकेला प्राप्त झाल्याने ठराव करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करून प्रशासनाने शहर सुधारणा समितीसमोर ठेवला होता. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली. यानंतर हा प्रस्ताव मुख्य सभेच्या मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

Back to top button