पुणे: ‘रिंगरोड’ बाधित शेतकरी होणार ‘ मालामाल’, हेक्टरी किमान पाच ते सहा कोटी रक्कम मिळणार | पुढारी

पुणे: ‘रिंगरोड’ बाधित शेतकरी होणार ‘ मालामाल’, हेक्टरी किमान पाच ते सहा कोटी रक्कम मिळणार

शिवाजी शिंदे

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोड (वर्तुळाकार) रस्त्याचे काम हाती घेतले आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात या प्रकल्पाचे भाग करण्यात आले आहेत. हा रस्ता तयार करण्यात येत असताना ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे. त्या भागातील शेतकरी आणि नागरिक यांना बाजारभावापेक्षा पाचपट अधिक रक्कम देण्यात येणार आहे. तर झाडांची रक्कम वेगळीच असणार आहे. शासनाकडून मिळणाऱ्या रक्कमेमुळे संबधित भागातील नागरिक, शेतकरी कोट्याधीश होणार आहेत. प्रति हेक्टरी किमान 5 ते 6 कोटी रक्कम मिळणार आहे. या रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किमान तीन हजार असल्याची बाब समोर आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यात या प्रकल्पाचे भाग करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात पश्चिम भागातील कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या रस्त्याची लांबी 68 किलोमीटर असून 910 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. भोर, हवेली, मावळ, मुळशी या चार तालुक्यांतून हा रस्ता प्रस्तावित आहे. त्यानुसार या गावातील जमिनींचे दर निश्चित करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या मदतीने मूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रकिया पूर्ण होत मावळ तालुक्यातील पाचर्णे, बेंबड ओहोळ, धामणे, परंदवाडी आणि उर्से या पाच गावातील मोजणी पूर्ण करून भूसंपादनाचे दर निश्चित करण्यात आले आहेत.

जमिनी संपादित करून त्यासाठी दर निश्चित करण्यासाठी मोबदला निश्चिती मूल्यदर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये महसूल, जलसंपदा, भूमी अभिलेख, कृषी यासह शासनाच्या इतर विभागाचे अधिकारी आहेत. सुमारे 110 किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड आहे. पूर्व आणि पश्चिम भागात असलेल्या गावांमधील भूसंपादन करण्यासाठी नऊ हजार कोटीहून अधिक रकमेची गरज असून, रिंगरोडसाठी 1 हजार 750 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

रिंगरोडसाठी आवश्यक असलेली जागा संपादित करण्यासाठी पश्चिम भागाकडील उर्से गावापासून सुरूवात झाली आहे. त्यानुसार दर निश्चिती समितीकडून या भागातील बाधित शेतकऱ्यांसाठी दर निश्चित केले असून, त्याच्या पाच पट रक्कम अदा करण्यास सुरूवात झाली आहे. तर पूर्व भागातील जमीनींचे दर लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. बाजारभावापेक्षा पाचपट अधिक रक्कम मिळणार असल्यामुळे शेतकरी मालामाल (कोट्याधीश) होणार आहेत.

या गावांतून जाणार ‘रिंगरोड’

 भोर – केळवडे, कांजळे, खोपी, कुसगाव, रांजे

 हवेली – रहाटवडे, कल्याण, घेरासिंहगड, खासगाव मावळ,

वरदाडे, मालखेड, सांडवी बुद्रूक, सांगरूण, बहुली

मुळशी – कातवडी, मारणेवाडी, आंबेगाव, उरवडे, कासार आंबोली,

भरे, अंबडवेट, घोटावडे, रिंहे, केससेवाडी, पिंपलोळी

मावळ – पाचर्णे, बेंबडओहोळे, धामणे, परंदवाडी, उर्से

असे असणार आहेत दर ( गावांनुसार दर वेगवेगळे आहेत.)

1) उरावडे :- प्रति हेक्टर मूळ दर 1 कोटी 20 लाख , बाजारभावानुसार पाच अधिक म्हणजे 6 कोटी
2)मातेरे :- प्रति हेक्टर मूळ दर 1 कोटी 16 लाख, याच्या पाचपट किमान 5 कोटी 80 लाख
3)कातवाडी:- प्रति हेक्टर मूळ दर 55 लाख 23 हजार याच्या पाच पट सुमारे 3 कोटी
4)परंदवाडी:- प्रति हेक्टर मूळ दर 92 लाख 97 हजार याच्या पट सुमारे 4 कोटी 70 लाख
5) चांदवडे: – प्रति हेक्टर मूळ दर 76 लाख 70 हजार याच्या पाच पट 3 कोटी 85 लाख
या नुसार पूर्व आणि पश्चिम भागातील रिंगरोडसाठी संपादित करण्यात येणा-या जमीनींचे दर वेगवेगळे असणार आहेत

Back to top button