पिंपरी : आता ‘ट्विट’वरुन करा तक्रार ; पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे ट्विटर अ‍ॅक्टिव्ह

Twitter Down
Twitter Down
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  एखाद्या समस्येची वारंवार तक्रार करूनही स्थानिक पोलिस दुर्लक्ष करीत आहेत, तर आता तुम्ही थेट ट्विटरच्या माध्यमातून आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करू शकता. तसेच, एखादी गोष्ट वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनासही आणून देऊ शकता. यातील विशेष बाब म्हणजे ट्विटर येणार्‍या पोस्टकडे उच्चपदस्थ अधिकार्‍यांचे लक्ष आहे. त्यामुळे तक्रार येताच काही वेळातच प्रतिसाद
मिळत आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोशल मीडियावरील आपले अकाउंट सुरू केले. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यू ट्यूबवरील खात्यांचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र, तेव्हापासून ट्विटरसह अन्य खाती इन अ‍ॅक्टिव्ह होती. नुकतेच पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोशल मीडियाचा आढावा घेऊन पहिल्या टप्प्यात ट्विटर अ‍ॅक्टिव्ह केले आहे.

इतर प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्टिव्ह करा
तडीपार गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी मागील काळात एक्स ट्रॅकर सुरू करण्यात आले. मात्र, याचा प्रभावी वापर होत नसल्याचे अलीकडे दिसून येत आहे. यू-ट्यूबवरही आत्तापर्यंत केवळ एकच व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. फेसबुक पेजकडेही पोलिसांचे दुर्लक्ष आहे. नागरिकांशी संवाद वाढवण्यासाठी ट्विटरप्रमाणेच इतरही प्लॅटफॉर्म सक्रिय करण्याची गरज आहे.

आयटीनगरी असल्याने ट्विटरला प्राधान्य
आयटीनगरी अशी पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. हिंजवडी, तळवडे भागात शेकडो आयटी कंपन्या आहेत. येथे काम करणार्‍या उच्चशिक्षित वर्गाकडून ट्विटरचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडून सुरुवातीला ट्विटर अ‍ॅक्टिव्ह करण्यात आले.

तत्काळ प्रतिसाद
ट्विटर हँडल करण्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ट्विटरवर पथकांचे उल्लेखनीय तपास, नागरिकांना आवाहन करणार्‍या पोस्ट केल्या जात आहेत. पोलिसांच्या पोस्टवर नागरिकही भरभरून प्रतिसाद देऊ लागले आहे. नागरिकाने टि्वटरवर तक्रार केल्यास संबंधितांकडे याचा पाठपुरावा केला जातो. त्यानंतर ट्विटरवरच जाहीररित्या समस्येचे समाधान केल्याचे फोटो पोस्ट केले जात आहेत.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सूचनेनुसार टि्वटर पुन्हा एकदा अ‍ॅक्टिव्ह करण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टि्वटरवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन नागरिकांचे समाधान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
                                    – डॉ. संजय तुंगार, सायबर सेल, पिंपरी चिंचवड.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news