पुणे :  विद्यापीठ परिसरात वाहतुकीत बदल ; गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना | पुढारी

पुणे :  विद्यापीठ परिसरात वाहतुकीत बदल ; गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्ता, पाषाण रस्ता, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता व इतर प्रभावित रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.  बाणेर रोड व औध रोडने विद्यापीठ चौकात येणारी वाहने ही विनासिग्नल शिवाजीनगरकडे डाव्या लेनने जाण्याबाबत प्रस्तावित आहे. तसेच विद्यापीठ चौक येथे पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ देण्यात येत आहे. गणेशखिंड रोडने सेनापती बापट रोडकडे जाण्याकरिता यापूर्वी कॉसमॉस बँक येथे यूटर्न देण्यात आला होता. हा यूटर्न बंद करून सेनापती बापट रोड जंक्शन येथून उजवीकडे वळण्यास परवानगी देण्यात येणार आहे. सेनापती बापट रोडने विद्यापीठ चौकाकडे येणारी वाहतूक सेनापती बापट रोड जंक्शन येथून डावीकडे वळून सरळ पाषाण रोडकडे वळविण्यात येणार आहे.

पर्यायी वर्तुळाकर मार्ग : – गणेशखिंड रोडकडून व सेनापती बापट रोडकडून पुणे विद्यापीठ, चतुःश्रृंगी पोलिस ठाणे, केंद्रीय विद्यालय, कस्तुरबा गांधी वसाहतीकडे जाणार्‍या वाहनांकरिता पाषाण रोडने पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या सिंहगड गेट येथून उजवीकडे वळून बाणेर रोडने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जाता येईल. किंवा पाषाण रोडने अभिमानश्री सोसायटी, पाषाण रोड जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी बाणेर रोडने उजवीकडे वळून सरळ विद्यापीठ चौकातून डावीकडे वळून औंधकडे जाता येईल. किंवा गणेशखिंड रोडकडून व सेनापती बापट रोडकडून औंधकडे जाणार्‍या वाहनांकरिता पाषाण रोडने अभिमानश्री सोसायटी, पाषाण रोड जंक्शन, उजवीकडे वळून अभिमानश्री सोसायटी, बोणर रोड जंक्शन डावीकडे वळून बाणेर फाटा, उजवीकडे वळून सर्जा हॉटेल कॉर्नर डावीकडे वळून क्रोमा मॉल रस्त्याने किंवा बाणेर फाटा उजवीकडे वळून आयटीआय रोडने परिहार चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

पिंपरी चिंचवड बाजूने राजीव गांधी पुलाकडून पुणे स्टेशनकडे जाणार्‍या व परत येणार्‍या नागरिकांसाठी पर्यायी मार्ग-
पर्यायी मार्ग राजीव गांधी पुलाकडून खडकी, येरवडा पुणे स्टेशन, लष्कर, कोरेगाव पार्ककडे जाणार्‍या वाहनांकरिता ब—ेमेन चौकातून डावीकडे वळून स्पायसर कॉलेज रोड, आंबेडकर चौक, साई चौक, उजवीकडे वळून खडकी पोलिस स्टेशन अंडरपास डावीकडे वळून चर्च चौक, जुना पुणे- मुंबई महामार्गाचा वापर करता येईल.

Back to top button