पुणे : ससूनमध्ये चिठ्ठी पद्धतीला ‘सोडचिठ्ठी’ ; ससूनचे नवे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची माहिती | पुढारी

पुणे : ससूनमध्ये चिठ्ठी पद्धतीला ‘सोडचिठ्ठी’ ; ससूनचे नवे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा:  सर्व समाजाला मोफत आरोग्यसेवा देणारे केंद्र अशी ससून रुग्णालयाची ओळख असली, तरी गेल्या काही वर्षांत औषधांपासून ते तपासण्यांपर्यंतच्या सेवा बाहेरच्या खासगी रुग्णालयांकडून करून आणण्यासाठी चिठ्ठ्या देण्याची पद्धत बोकाळली. ससून हे खर्‍या अर्थाने गोरगरिबांना मोफत सेवा देणारे केंद्र बनवण्यासाठी चिठ्ठी पद्धतीलाच अटकाव घालण्याची योजना ससूनचे नवे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी आखली आहे.

आधुनिक यंत्रसामग्री घेणार
ससूनमधील यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण करण्यासाठी खास योजना आखण्यात आल्याची माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली. कर्करोगाचे निदान झालेल्या रुग्णाच्या शरीरात रोग कितपत पसरला आहे, याचे निदान करण्यासाठी पेट स्कॅन करावे लागते. खासगी रुग्णालयांमध्ये पेट (पीईटी) स्कॅनसाठी 15 ते 20 हजार रुपये मोजावे लागतात. ससून रुग्णालयात स्कॅनसाठी लागणारे मशिन उपलब्ध झाले आहे. दरांबाबत निर्णय झाल्यावर लगेचच तपासणी सुरू केली जाणार आहे. याचबरोबर रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी, बेरियॅट्रिक सर्जरी यादृष्टीनेही प्रयत्न सुरू आहे.

दै. ‘पुढारी’ कार्यालयाला डॉ. ठाकूर यांनी नुकतीच भेट दिली आणि संपादकीय सहकार्‍यांशी संवाद साधला. या वेळी ससूनमधील उपचार, आरोग्यसुविधांची स्थिती, रुग्णांच्या तक्रारी, नव्या योजना याबाबत सविस्तर भाष्य केले. ससूनचा चेहरामोहरा बदलून अधिकाधिकरीत्या समाजाभिमुख बनविण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या मुलाखतीतील प्रमुख मुद्द्यांचा हा सारांश.

मोफत उपचारांसाठी सीएसआर
महात्मा फुले योजनेंतर्गत रुग्णांना मोफत उपचार दिले जातात. मात्र, सर्व रुग्णांना योजनेचा लाभ मिळत नाही किंवा खर्च वाढल्यास योजनेतून लाभ देण्यास मर्यादा येतात. सर्वच रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळावेत, यासाठी विविध कंपन्या, स्वयंसेवी संस्था यांच्या सामाजिक दायित्व निधी म्हणजेच सीएसआरमधून मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तपासण्यांसाठी, उपचारांसाठी लागणारी अद्ययावत साधनसामग्री घेण्यासाठीही सीएसआरचा उपयोग होतो.

औषधसाठा पुरेसा ठेवण्यावर भर
ससून रुग्णालयात बर्‍याचदा रुग्णांना औषधे बाहेरून आणण्यासाठी सांगितले जाते. त्यासाठी औषधांची चिठ्ठी दिली जाते. ससूनमध्ये औषधे उपलब्ध नाहीत, असे कारण त्यासाठी दिले जाते. तसेच, अनेक तपासण्याही वेगवेगळ्या कारणांमुळे ससूनमध्ये होऊ शकत नाहीत, असे सांगून खासगी संस्थांकडून करून आणण्यास भाग पाडले जाते, अशा तक्रारी बर्‍याच काळापासून करण्यात येत होत्या. त्यामुळे गरीब रुग्णांना ऐपत नसतानाही बाहेरून औषधे आणण्याशिवाय गत्यंतर नसते. याबाबत डॉ. ठाकूर यांना विचारले असता त्यांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी पुरेशी औषधे उपलब्ध होतील, याची प्राधान्याने काळजी घेतली जाणार आहे, असे स्पष्ट केले.

प्रत्येक वॉर्डात आयसीयू
ससूनमध्ये दररोज दीड ते दोन हजार रुग्णांवर उपचार केले जातात. बहुतांश वेळा रुग्ण अतिगंभीर परिस्थितीत असताना ससूनमध्ये दाखल होतात आणि आयसीयू बेड मिळण्यासाठी बरीच वाट पाहावी लागते. त्यामुळेच आता प्रत्येक वॉर्डशी संलग्न असलेला पाच बेडचा आयसीयू कार्यान्वित केला जाणार आहे, जेणेकरून रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळू शकतील.

प्रत्येक वॉर्डात आयसीयू
ससूनमध्ये दररोज दीड ते दोन हजार रुग्णांवर उपचार केले जातात. बहुतांश वेळा रुग्ण अतिगंभीर परिस्थितीत असताना ससूनमध्ये दाखल होतात आणि आयसीयू बेड मिळण्यासाठी बरीच वाट पाहावी लागते. त्यामुळेच आता प्रत्येक वॉर्डशी संलग्न असलेला पाच बेडचा आयसीयू कार्यान्वित केला जाणार आहे, जेणेकरून रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळू शकतील.

खासगी लॅबशी सामंजस्य करार करणार

ससून रुग्णालयामध्ये बहुतेक सर्व तपासण्या केल्या जातात. मात्र, काही वेळा मशिन बंद असणे, रुग्णांची खूप गर्दी होणे, अशा विविध कारणांमुळे तपासण्यांना विलंब होतो. अशा वेळी रुग्णालयात होणार्‍या तपासण्या शासकीय दरांमध्ये बाहेरील लॅबमध्ये व्हाव्यात, यासाठी सामंजस्य करार करण्यात येत आहेत.

उपचारांची वर्गवारी करणार
ससून सर्वोपचार रुग्णालयाची क्षमता 1800 खाटांची आहे. सर्व खाटा कायम व्यापलेल्या असल्याने रुग्णसेवेचा मोठा ताण निर्माण होतो. त्यामुळे अनेकदा उपचार लांबणीवर टाकावे लागतात. अनेक रुग्णांना गरज असूनही खाटा उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर आता उपचारांची वर्गवारी केली जाणार आहे. अतितातडीचे उपचार, नियोजित शस्त्रक्रिया आणि लांबणीवर टाकण्याजोगे उपचार, अशी वर्गवारी करून त्यादृष्टीने रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याच्या तारखा, शस्त्रक्रियांच्या तारखा दिल्या जातील. महत्त्वाच्या तपासण्या करून त्यांना घरी सोडले जाईल आणि शस्त्रक्रियेदिवशी बोलावले जाईल, जेणेकरून खाटांची उपलब्धता योग्य पद्धतीने करून देता येईल, असेही डॉ. ठाकूर यांनी नमूद केले.

Back to top button