पुणे : धक्का लागला म्हणून रिक्षा चालकाचा खून | पुढारी

पुणे : धक्का लागला म्हणून रिक्षा चालकाचा खून

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंपाजवळ रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात गाडी घासल्याने झालेल्या वाद झाला. त्यानंतर दुचाकीस्वार तरूणांनी केलेल्या मारहाणीत रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. खून केल्यानंतर पसार झालेल्या दोघांना दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने काही तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. किरण राजू दांडेकर (30, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुकील गफुर शेख (रा. कोंढवा) आणि अरबाज मेहबुब शेख (रा. काशेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत मृत किरण यांचा भाऊ मधुकर राजू दांडेकर याने दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांनी सांगितले, सोमवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास किरण दांडेकर, त्याचा भाऊ मधूकर दांडेकर, बंटी कसबे, निलबा , राजू हे किरणच्या रिक्षातून गॅस भरण्यासाठी भापकर पेट्रोल पंपाकडे जात असताना दुचाकीवर असलेल्या मुकील आणि आरबाज यांच्या दुचाकीला रिक्षा घासल्याने आरोपी आणि किरण यांच्यात वाद झाले. त्याच्या वादाचे पर्यवसन मोठ्या भांडणात झाले. यावेळी चाललेल्या भांडणात आरोपीपैकी एकाने किरणच्या छातीवर जोरात लाथ मारली. तो बेशुध्द होऊन खाली पडल्याने त्याच्या त्याचा या मारहाणीत मृत्यू झाला.

त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारपूर्वीच किरणचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपासात माहिती मिळालेल्या आरोपींच्या दुचाकीच्या चार अंकी नंबरवरून पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपींचा माग काढून लपून बसलेल्या आरोपींना बेड्या ठोकल्या. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, गुन्हे निरीक्षक विजय खोमणे यांनी घटनास्थही भेट दिली. पुढील तपास उप निरीक्षक एस. टी. जगदाळे करत आहे.

Back to top button