पुणे : दोन हजार वस्त्यांची जातिवाचक नावे हद्दपार ; समाजकल्याण विभागाच्या प्रयत्नांना यश | पुढारी

पुणे : दोन हजार वस्त्यांची जातिवाचक नावे हद्दपार ; समाजकल्याण विभागाच्या प्रयत्नांना यश

पुणे : शिवाजी शिंदे  : सामाजिक क्रांती व समता प्रस्थापित करण्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला होता. राज्यातील वस्त्यांना जातिवाचक नावे देण्याची प्रथा हद्दपार करून वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. समाजकल्याण विभागाने विविध यंत्रणांशी समन्वय साधून या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी केली. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील 2 हजार वस्त्यांची जातिवाचक नावे हद्दपार झाली आहेत. त्याऐवजी महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत. राज्यात विविध शहरात व ग्रामीण भागात काही वस्त्यांना जातिवाचक नावे दिल्याचे दिसून आले आहे.

अशी जातिवाचक नावे पुरोगामी राज्याला भूषणावह नाहीत. ही बाब विचारात घेऊन राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या द़ृष्टीने राज्यातील सर्व शहरे व ग्रामीण भागातील वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून त्या वस्त्यांना विविध महापुरुषांची किंवा तत्सम नावे देण्याबाबतची कार्यवाही सामाजिक न्याय विभागाने सुरू केली आहे. समाजकल्याण विभागाच्या पुणे प्रादेशिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे विभागात शहर व ग्रामीण भागातील एकूण 238 वस्त्यांची व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलली असून, त्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील 94 नावे, नगरपालिका क्षेत्रातील 123 नावे व ग्रामीण भागातील 1 हजार 856 नावे बदलली आहेत.

पुणे विभागात सर्वाधिक नावे ही सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 374 नावे बदलली आहेत. त्या खालोखाल 599 नावे पुणे जिल्ह्यातील बदलण्यात आली. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 94 नावे बदलली आहेत. याबरोबरच सातारा आणि सांगली जिल्ह्यात नावे बदलण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार या दोन्ही जिल्ह्यांत नावे बदलण्याची अंतिम प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावरील बैठकांमध्ये सातत्याने हा विषय प्राधान्याने घेण्यात आला. याविषयी पुणे विभागात कार्यवाही करण्यात आली आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाबरोबरच विविध यंत्रणांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
– बाळासाहेब सोळंकी प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, पुणे विभाग

Back to top button