पुणे : पोलिस तीन तास पायी गस्त घालणार | पुढारी

पुणे : पोलिस तीन तास पायी गस्त घालणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दररोज सायंकाळी तीन तास पोलिस पायी गस्त घालणार आहेत. त्यांच्यावर पोलिस उपायुक्तांची नजर राहणार असून, प्रत्येक तासाला पायी गस्त घालणार्‍या पथकांचे लोकेशन त्यांच्याकडून घेतले जाणार आहे. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा उपक्रम सुरू करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी  दिल्या आहेत.  पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, स्थानिक पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व त्यांचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून परिसरात गस्त घातली जाणार आहे. प्रत्येक ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणे तसेच पूर्वी गुन्हेगारीचा इतिहास असलेल्या ठिकाणांवर प्रामुख्याने पायी गस्ती मार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दक्ष

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट झाले आहेत. पोलिस आयुक्तालयात दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिस ठाण्यांची विशेष पथके तयार केली आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी पाच निमलष्करी दलाच्या पाच तुकड्या मागवल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

मंजूर बक्षिसांसाठी पाठपुरावा
पोलिस दलातील कर्मचार्‍यांना त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल बक्षीस दिले जाते. मात्र, कोरोना संसर्गाच्या कालावधीनंतर शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्याने त्याचा प्रत्यक्ष लाभ कामगिरी करणार्‍यांना मिळाला नाही. बक्षिसे जाहीर झाली मात्र, त्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे बक्षिसांची रक्कम संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

सीआर मोबाईल व्हॅन 24 तास ऑन ड्यूटी

पोलिस ठाण्याच्या हद्दीत 24 तास गस्त घालण्यासाठी सीआर मोबाईल व्हॅन ऑन ड्यूटी असणार आहे. तांत्रिकदृष्ट्या तसे अद्ययावत बदल करण्यात आले आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी एक सीआर मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे.

गुटखामाफियांवर करडी नजर

चार दिवसांत पन्नासहून (54) अधिक गुटखा विक्रीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.

Back to top button