पुणे : ‘जेईई मेन्स’मध्ये वीस विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल | पुढारी

पुणे : ‘जेईई मेन्स’मध्ये वीस विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा
‘जेईई मेन्स’चा निकाल मंगळवारी (दि. 7) जाहीर केला. त्यानुसार देशातील वीस विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले आहेत. पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी देशात सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्रातून झाली असल्याची माहिती एनटीएने दिली.  जेईई मेन्स दोन सत्रांत घेतली जाते. त्यानुसार पहिल्या सत्राची परीक्षा 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आली. पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी एकूण 8 लाख 60 हजार 64 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

त्यातील 46 हजार 465 विद्यार्थ्यांनी पेपर दोनसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 95.8 टक्के अर्थात् 8 लाख 23 हजार 967 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. जेईई मेन्सची ही आतापर्यंतची सर्वाधिक उपस्थिती आहे. पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान प्रवेशासाठी पेपर एक आणि वास्तुकला, नियोजन अभ्यासक्रमासाठी पेपर दोन असे नियोजन होते. निकालात देशभरातील एकूण वीस विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइल प्राप्त केले. त्यात अभिनित मजेठी, अमोघ जालान, अपूर्व समोटा, अशिक स्टेनी, बिक्किना अभिनव चौधरी, देशंक प्रताप सिंग, ध्रुव संजय जैन, ज्ञानेश हेमेंद्र शिंदे, दुग्गिनेनी वेंकट युगेश, गुलशन कुमार, गुथीकोंडा अभिराम, कुशल विजयवर्गीय, क्रिश गुप्ता, मयांक सोनी, एन. के. विश्वजित, निपुण गोयल, ऋषी कालरा, सोहम दास, हर्षूल संजयभाई सुथार, विविलाला चिद्विलास रेड्डी यांचा समावेश आहे. यंदा देशातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी महाराष्ट्रातील होते. नोंदणी केलेल्या एक लाख सहा हजार 106 विद्यार्थ्यांमध्ये 71 हजार 13 मुले, तर 34 हजार 93 मुलींचा समावेश होता. आता एप्रिल सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर दोन परीक्षांपैकी सर्वोत्तम गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातील.

एप्रिल सत्रासाठी नोंदणी सुरू
जेईई मेन्सची दुसर्‍या सत्राची परीक्षा 6 ते 12 एप्रिल या कालावधीत होणार आहे. त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. अधिक माहिती हीींिीं://पींर.रल.ळप/ या संकेत स्थळावर देण्यात आली आहे.

Back to top button