पारगाव : बिटाच्या बाजारभावात मोठी घसरण | पुढारी

पारगाव : बिटाच्या बाजारभावात मोठी घसरण

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : बिटाच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात सध्या बीट काढणीची कामे वेगात सुरू आहेत. परंतु सध्या मिळणार्‍या कवडीमोल बाजारभावामुळे वाहतूक व मजुरीचा खर्च वसूल होत नसल्याने बीट उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात बिटाचे पीक मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेतात.

मध्यंतरीच्या काळात बीट पिकाला उच्चांकी बाजारभावाची साथ मिळाली होती. बिटाला 10 किलोला तब्बल 500 रुपयांपेक्षा अधिक बाजारभाव मिळाला होता. शेतकर्‍यांना लाखो रुपये बीट पिकाने मिळवून दिले होते. परंतु सध्या बिटाच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. 10 किलोला 20 ते 50 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव शेतकर्‍यांना परवडणारा नाही.

या बाजारभावातून बीट पिकासाठी गुंतविलेले भांडवल तर दूरच, परंतु वाहतूक व मजुरीचा खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बीट पिकाची काढणी करताना तसेच बीट फळे धुताना मजुरांची संख्या अधिक लागते. त्यामुळे मजुरी अधिक द्यावी लागते. दरम्यान, तालुक्याच्या पूर्वभागात रांजणी येथे बीट पिकाची काढणी जोरात सुरू आहे. परंतु पिकाला बाजारभावाची साथ मिळत नसल्याने बीट उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसत आहे.

Back to top button