पारगाव : दूध उत्पादकांची आतापासूनच कसरत | पुढारी

पारगाव : दूध उत्पादकांची आतापासूनच कसरत

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : चाराटंचाईमुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात दूध उत्पादक शेतकर्‍यांची आतापासूनच कसरत सुरू झाली आहे. शेतकरी दुचाकी ,बैलगाड्यांमधून चारा विकत आणून दूध देणार्‍या जनावरांना खाऊ घालताना दिसत आहेत. तालुक्याच्या पूर्वभागात शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. प्रत्येक शेतकर्‍याकडे जादा दूध देणार्‍या संकरित गाई आहेत. या परिसरात खासगी दूध संकलन करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचा शेतकर्‍यांना चांगला फायदा होत आहे.

परंतु, यंदा चाराटंचाईचे संकट लवकरच निर्माण झाल्याने शेतकर्‍यांना आतापासूनच अक्षरशः कसरत करावी लागत आहे. विकत चारा घेऊन दुधाळ जनावरांना खाऊ घालावा लागत आहे. परिसरात सर्वाधिक उसाचे क्षेत्र असल्याने उसाचे वाढे मुबलक प्रमाणात शेतकर्‍यांना मिळते. यंदा वाढेही कमी प्रमाणातच मिळत आहे. तसेच वाढे विकत घेण्यासाठी शेतकर्‍यांना ऊस वाहतूक करणार्‍या टायर गाड्यांची वाट पाहावी लागत आहे. मका, कडवळ, घास हा चारा दुसर्‍या शेतकर्‍याकडून विकत घ्यावा लागत आहे. हा चारा दुचाकी किंवा बैलगाडीतून आणावा लागत असल्याने मोठी कसरत शेतकर्‍यांना करावी लागत आहे.

Back to top button