मातोश्रीचे अधिष्ठान कुणीही उठवू शकणार नाही : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे | पुढारी

मातोश्रीचे अधिष्ठान कुणीही उठवू शकणार नाही : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे

जुन्नर(पुणे), पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेला फूट नवीन नाही. आधीचे जे जे गेले ते ते शिवसेनेच्या मुळावर उठले नव्हते. मात्र, एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या मुळावरच उठले आहेत. परंतु, ’मातोश्री’चे अधिष्ठान कुणीही उठवू शकणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले. जुन्नर बाजार समितीच्या प्रांगणात महाप्रबोधन यात्रेनिमित्त सोमवारी (दि. 6) दुपारी आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

या वेळी शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, जयश्री पलांडे, दिलीप बामणे, विजया शिंदे, अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, सुरेश भोर, श्रद्धा कदम, अविनाश रहाणे, किरण जठार आदींसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, कटकारस्थान करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यात आले.

या सर्व घटनांचा पर्दाफाश करण्यासाठी महाप्रबोधन यात्रा राज्यभर सुरू आहे. महापुरुषांचा सतत अवमान करण्याची जणू स्पर्धा लागली आहे. हे काम भाजपच्या विविध पदाधिकार्‍यांकडून जाणीवपूर्वक होत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलूनही निंदाजनक प्रस्ताव सभागृहात सत्ताधार्‍यांकडून मांडला गेला नाही.

प्रबोधन यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून भाजपने कटकारस्थानांना सुरुवात केली असून, जुने व्हिडीओ बाहेर काढले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या जाहिरातींवर 2014 पासून करोडो रुपयांचा खर्च केला. हाच पैसा शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी खर्च करणे आवश्यक होते, असे अंधारे यांनी सांगितले.

केसरकरांना आता कंठ फुटला
गोड बोलून केसाने गळा कापणारे दीपक केसरकर शिवसेनेत असताना काहीच बोलत नव्हते. आता मात्र त्यांना कंठ फुटला आहे. ज्या लोकांनी शिवसेनेच्या मतांचा गैरवापर केला ते माजी खासदार शिवाजीराव आढळराव, माजी आमदार शरद सोनवणे हे शासनाकडे प्रश्न विचारू शकत नाहीत. येणार्‍या काळात निवडणुका होणार आहेत. मतदार सुज्ञ असून, ते परिवर्तन करण्याची वाट पाहत आहेत, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.

सचिन अहिर म्हणाले की, शिवसेनेने जुन्नर तालुक्याला खूप काही दिले. परंतु, काही जणांनी स्वतःचे पोट भरण्याचे काम केले. पक्षाने त्यांना काही कमी केले नसताना त्यांनी मात्र पक्षाची साथ सोडली. त्यांना पक्ष वाढविता आला नाही. यापुढील निवडणुकांत मतदार अशांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.

Back to top button