वेल्हे : धरणखोर्‍यातील पुलांना संरक्षक कठडे नसल्याने दुर्घटनेची भीती | पुढारी

वेल्हे : धरणखोर्‍यातील पुलांना संरक्षक कठडे नसल्याने दुर्घटनेची भीती

वेल्हे(पूणे); पुढारी वृत्तसेवा : पानशेत व वरसगाव धरणखोर्‍यातील रस्त्यांवरील अनेक पुलांना संरक्षक कठडे नसल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते, पूल उभारले आहेत. मात्र, संरक्षक कठडेच नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. आंबेगाव, शिरकोली, पोळे माणगाव आदी ठिकाणी रस्त्यावरील पुलांना संरक्षक कठडे नाहीत.

शिरकोली येथील शिवकालीन श्री शिरकाईदेवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ असते तसेच अलिकडच्या काळात या भागात पर्यटकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कठडे नसलेल्या पुलांवरून बस, कार आदी वाहने खोल दरीत तसेच धरणात कोसळून मोठ्या दुर्घटनेची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत शिरकाई देवस्थानचे सचिव व सरपंच अमोल पडवळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.

कठडे नसल्याने कार धरणात कोसळून दुर्घटना
दोन्ही धरणभागातील रस्त्यांच्या एका बाजूला उंच डोंगररांगा तर दुसर्‍या बाजूला धरणाचे विस्तीर्ण पाणलोटक्षेत्र आहे. पानशेत धरणभागातील कादवे येथील धरणतीरावरील पुलांना उंच संरक्षक कठडे नाहीत. दोन वर्षांपूर्वी पुलावरून धरणात कार कोसळून दुर्घटना घडली होती. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता आहे. शिरकोली पोळे येथे मोठ्या ओढ्यावरील पुलाला संरक्षक कठडे नसल्याने दुर्घटना टाळण्यासाठी दोन्ही बाजूला मोठमोठे दगड ठेवले आहेत.

Back to top button