हडपसर : अमरकॉटेज भागातील मैदान मद्यपींचा अड्डा!

हडपसर (पुणे); पुढारी वृत्तसंस्था : अमरकॉटेज परिसरातील भोसले क्रीडांगणाची दुरवस्था झाली असून, हे ठिकाण सध्या मद्यपींचा अड्डा बनले आहे. या ठिकाणी असलेल्या स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध नसल्याने उघड्यावर प्रात:विधी केल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी सांगितले.
हडपसर येथील भोसले मैदानात रात्री व दिवस मद्यपी, गांजा पिणारे आणि अमली पदार्थांचे सेवन करणार्यांची वर्दळ वाढली आहे. तसेच, मैदानामधील स्वच्छतागृहात पाणी नसल्यामुळे दुर्गंधी सुटलेली आहे. यामुळे परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणार्या नागरिकांना त्रास होत आहे. मैदानाच्या भिंती व प्रवेशद्वार तुटले आहे. या ठिकाणी दारूच्या बाटल्या, कचरा, गुटख्याच्या पुड्यांचा खच पडल्याचे चित्र दिसून येत आहे. ट्रॅकवरील फरशाही तुटलेल्या असून, आसन व्यवस्थेचीही दुरवस्था झाली आहे. ‘ओपन जीम’चे साहित्य चोरीला गेलेले आहे, तर शिल्लक आहे तेदेखील तुटलेले आहे.
या मैदानाची नियमित साफसफाई व स्वच्छता करण्यात यावी, संरक्षण भिंत बांधून द्याव्यात, अशी मागणी हडपसर भाजपचे अध्यक्ष संदीप दळवी, उपाध्यक्ष संदीप शेंडगे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सहायक आयुक्त प्रसाद काटकर यांना निवेदन दिले आहे. या मैदानाची दुरवस्था दूर न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. माजी नगरसेविका हेमलता मगर म्हणाल्या, की या मैदानाच्या दुरुस्तीबाबत महापालिका प्रशासनाला कळविण्यात आले असून, लवकरच आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
अमर कॉटेज परिसरातील भोसले क्रींडागण येथील साफसफाई नियमित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था केली जाईल. तुटलेले गेट ही बसविले जाईल. मैदानाच्या सुरक्षेतेसाठी दोन सुरक्षारक्षक नेमले आहे. येथील गैरप्रकारला आळा बसण्यासाठी पोलिसांनाही कळविले आहे.
-प्रसाद काटकर,
सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालयहडपसर परिसरातील क्रीडांगणे व उद्यानांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे मुलांसह नागरिकांची गैरसोय होत आहे.
-रवी तुपे, अविनाश मगर,
रहिवासी, हडपसरलोकांना सकाळी आणि संध्याकाळी चालणे व व्यायामासाठी या मैदानातील ट्रॅक गरजेचा आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. हे मैदान सध्या मद्यपींचा अड्डा बनले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
– संदीप दळवी, अध्यक्ष, हडपसर भाजप