पुणे : एकाच चोरट्याने 3 ठिकाणी दागिने हिसकावले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एका चोरट्याने एकट्याने एका पाठोपाठ एक तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याचा प्रकार रविवारी दिवसभरात घडला. या तिन्ही चोर्या एकाच चोरट्याने केल्याचा पोलिसांना संशय आहे. यातील पहिली घटना बिबवेवाडी येथील पासलकर चौकाजवळ रविवारी (दि.5) दुपारी 1 वाजता घडली. याबाबत पर्वती दर्शन येथील एका 52 वर्षांच्या महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या पतीसह मोटारसायकलवरून घरी जात होत्या. त्या वेळी पाठीमागून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे 55 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. परंतु, त्यांनी हे मंगळसूत्र धरल्याने त्याचा अर्धा भाग चोरट्याकडे गेला. तो घेऊन चोरटा पळून गेला.
दुसरी घटना कोथरूडमधील महात्मा सोसायटीतील भुजबळ टाऊनशिप येथे दुपारी पावणेतीन वाजता घडली. याबाबत एका 56 वर्षांच्या महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मुलीसह एका कार्यक्रमावरून घरी जात होत्या. त्या वेळी त्यांची मुलगी खरेदी करण्यासाठी दुकानात गेल्याने त्या रस्त्याच्या कडेला वाट पाहात थांबल्या होत्या. तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 90 हजार रुपयांचे 50 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
तिसरी घटना कर्वे रोडवरील डेक्कन जिमखान्यावरील सावरकर चौकात दुपारी साडेतीन वाजता घडली. याबाबत हडपसर येथील एका 32 वर्षांच्या महिलेने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या आपल्या पतीसह मोटारसायकलवरून जात होत्या. सावरकर चौकात सिग्नल लागल्याने ते सिग्नलला थांबले होते. त्या वेळी पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपयांची 11 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून तो पळून गेला.
दुचाकीस्वार चोरट्यांचा उपद्रव कायम
शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच महिलांच्या गळ्यातील दागिने हे चोरटे हिसका मारून चोरी करत आहेत. दुचाकीवरून चाललेल्या महिला तसेच रस्त्याने चालत निघालेल्या पादचारी महिलांना या चोरट्यांकडून टार्गेट केले जाते आहे. जबरी चोरीच्या घटनांचा छडा मात्र पोलिसांना लावताना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.